अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. पण आता रणवीर सिंग हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनीदेखील रणवीर सिंगवर टीका केली आहे.
अबू आझमी यांनी रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट प्रकरण देशातील हिजाब वादाशी जोडलं आहे. देशात मुस्लीम महिलांनी हिजाब परिधान केल्यास विरोध होतो, मात्र रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला कुणीही विरोध करत नाही, अशी टीका आझमी यांनी केली आहे. ते सोलापूर याठिकाणी पत्रकार परिषदेत बोलत होते.
अबू आझमी यांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, देशात काही चित्रपटकर्ते नग्न फोटोशूट करू शकतात. मात्र, मुस्लीम महिला हिजाब परिधान करू शकत नाहीत. हिजाब परिधान करण्यात काय अडचण आहे? संपूर्ण जगभरात हिजाब परिधान केला जातो. मुस्लीम महिला कपड्यांच्या आतमध्ये काहीतरी चोरून आणतील किंवा लहान मुलं चोरून नेतील, अशी तुम्हाला भीती वाटत असेल, तर संबंधित महिला ज्या विभागात हिजाब परिधान करून जातात, त्या विभागात एका महिलेला बसवा. संबंधित महिलेकडून मुस्लीम महिलांची तपासणी करा. याला कुणीही विरोध करणार नाही. पण तुम्ही हिजाबवर बंदी कशी काय आणू शकता? असा सवाल अबू आझमी यांनी विचारला आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा- रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी…”
“मी देशातील १३० कोटी जनतेला सांगू इच्छितो की, सध्या काही चित्रपटकर्त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो समोर येत आहेत. ते फोटो सर्वजण पाहत आहेत. मात्र, यावर कुणीही काहीही बोलायला तयार नाही. अशा फोटोंवर कसल्याही प्रकारची बंदी नाहीये किंवा कुठेही गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. पण एखादी महिला हिजाब परिधान करून बाहेर गेली किंवा परीक्षेला गेली तर यांना खूप समस्या आहेत. प्रत्येक गोष्टीत हिंदू-मुस्लीम वाद उभा केला जातो” असंही अबू आझमी यावेळी म्हणाले.