Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर चांगलंच राजकारण तापलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं अबू आझमी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले. यानंतर अखेर आमदार अबू आझमी यांच्यावर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर आता अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मी माझं विधान मागे घेतलं तरीही माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, हा फक्त माझा नाही तर मी ज्या लोकांचे प्रतिनिधीत्व करतो त्यांच्यावर अन्याय आहे, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

निलंबनानंतर अबू आझमी यांनी काय म्हटलं?

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांचं आज निलंबन करण्यात आलं. निलंबनाच्या कारवाईनंतर अबू आझमी यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे. अबू आझमी यांनी म्हटलं की, “आताच मला माहिती मिळाली की या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळापूरतं माझं निलंबन करण्यात आलं आहे. माझी तब्येत खराब असल्यामुळे मी आज विधानसभेत गेलो नाही. दोन दिवसांपासून माझ्या विरोधात आंदोलन सुरु आहे. पण मी विधानसभेच्या सभागृहात काहीही बोललो नाही. मी विधानसभेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना जे बोललो त्यावरून माझं निलंबन करण्यात आलं”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

“मी चुकीचं काहीही बोललो नव्हतो, पण तरीही…”

“सभागृहाचं कामकाज चालालं यासाठी मी माझं विधान मागे घेतल्याचं बोललो आहे. मी चुकीचं काहीही बोललो नव्हतो. मात्र, तरीही सभागृहाचं कामकाज चालावं, गोंधळ होऊ नये, तसेच अधिवेशनात कामे मार्गी लागावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे मी जे विधानसभेच्या बाहेर बोललो होतो, ते विधान मी मागे देखील घेतलेलं आहे. मात्र, त्यानंतरही माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. माझे निलंबन हा केवळ माझ्यावरच नव्हे तर मी ज्या लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करतो त्यांच्यावर अन्याय आहे”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

अबू आझमी यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असं मी मानत नाही, असं विधान अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.

अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचं निलंबन

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. भाजपा शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत त्यांच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली. या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत.

Story img Loader