राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवारांचा गट ऐन अधिवेशनाच्या आधी सत्तेत जाऊन बसल्यामुळे विरोधकांचं संख्याबळ विधानसभेत कमालीचं घटलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अधिवेशनात आक्रमकपणे बाजू मांडली जात आहे. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांकडूनही त्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशात आज अबू आझमींच्या एका वक्तव्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला. यामुळे १० मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज स्थगितही करण्यात आलं होतं.
नेमकं काय घडलं?
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज विधानसभेत औरंगाबादमध्ये घडलेल्या एका घटनेचा मुद्दा उपस्थित केला. “आफताब पूनावाला नावाचा व्यक्ती होता. त्यानं एक चुकीचं कृत्य केलं. पण त्यानंतर संपूर्ण देशात मुस्लिमांविरोधात कारवाई सुरू झाली. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यांमध्ये सकल हिंदू समाज आक्रोश रॅली निघायला लागली. त्या मोर्चामध्ये मुस्लिमांना एवढं अपमानित केलं गेलं, की जणूकाही मुस्लिमांपेक्षा मोठा कुणी देशद्रोही असूच शकत नाही”, असं अबू आझमी म्हणाले.
“२९ मार्चच्या संध्याकाळी पाच वाजता औरंगाबादच्या राम मंदिराजवळ तीन लोक आले. त्यांनी घोषणा दिली की ‘इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना होगा’. आम्ही ते म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो. आम्ही जगात कुणासमोरच मस्तक झुकवू शकत नाही. आम्ही आमच्या आईसमोरही मस्तक झुकवत नाही. आमचा धर्म ही परवानगी देत नाही”, असं अबू आझमींनी म्हणताच सत्ताधारी बाकांवरून आरडाओरड सुरू झाली. यामुळे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.
“अजित पवार संबंध जपण्यात हुशार दिसतात”, भाजपा नेत्याचं खोचक ट्वीट!…
कामकाज सुरू झाल्यानंतर अबू आझमींच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतला. “वंदे मातरम न म्हणण्याची भूमिका चुकीची आहे. सभागृह सुरू होतानाही आपण वंदे मातरम लावतो”, असं फडणवीस म्हणाले.
“मला सर्वोच्च न्यायालयानं अधिकार दिलाय”
दरम्यान, नंतर विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना अबू आझमींनी आपली भूमिका स्पष्ट केली. “विषय भरकटवण्यासाठी वंदे मातरमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. वंदे मातरम जेव्हा सभागृहात लावलं जातं, तेव्हा मी उभा राहातो. मी वंदे मातरमचा आदर करतो. पण मी ते बोलू शकत नाही. कारण माझ्या धर्मात असं म्हटलंय की ज्या अल्लाहनं जमीन, आकाश, सूर्य, चंद्र, सगळं जग बनवलं, त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कुणासमोर मस्तक झुकवू शकत नाही. मी तुमचा अपमान तर करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मला अधिकार दिला आहे. पण तुम्ही प्रत्येक भागात जाऊन घोषणा देणार असाल, तर मी मानतो की ते लोक देशद्रोही आहेत”, असं अबू आझमी म्हणाले.
दरम्यान, या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी भूमिका मांडण्यात आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पुढच्या मुद्द्याला हात घातला आणि या वादावर पडदा पडला.