अहिल्यानगर : गोवंश हत्येस बंदी असूनही वारंवार कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या ८ सराईत गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नेवासा पोलिसांनी ८ जणांवर हा आदेश बजावला. नेवासे येथील नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी, अकील जाफर चौधरी (सर्व रा. नायकवाडी मोहल्ला, नेवासे) यांना दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

गोवंश तस्करी व कत्तली करणाऱ्या टोळीवर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच हद्दपारची कारवाई झाली असावी. नेवासा शहर व परिसरात बेकायदेशीरपणे गोवंशाची तस्करी करणारी टोळी कार्यरत होती. जनावरांना अमानुषपणे डांबून ठेवणे, भरधाव वाहनातून तस्करी करणे, धार्मिक भावना दुखावणे, यासारखे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही वेळोवेळी छापे टाकून या टोळीवर कारवाई केली होती. मात्र तरीही पुन्हा ही टोळी सक्रिय होत होती.

त्यामुळे नेवासा पोलिसांनी कठोर कारवाईसाठी या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी या प्रकरणाच्या सुनावणीत ८ जणांना नोटीसा बजाऊन खुलासा मागितला होता. मात्र समाधानकारक खुलासा न मिळाल्याने या टोळीला जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. हद्दपार कालावधीत कोणत्याही कारणास्तव जिल्ह्यात परत येण्यासाठी लेखी परवानगी आवश्यक असणार आहे तसेच ज्या ठिकाणी ते राहतील त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

नेवासा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. काही सराईत गुन्हेगारांवर आणखी कठोर कायदेशीर एमपीडीए सारखी आणखी कठोर कायदेशीर कारवाई भविष्यात केली जाईल, असे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जरे, अंमलदार राम माळी, महिला पोलीस अंमलदार वर्षा गरड यांनी हद्दपारचे प्रस्ताव तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Story img Loader