डॉ. शिरीष रावण
सुशासन या शब्दाचे जेव्हा आपण अवलोकन करतो, तेव्हा ग्रामीण भागाचा शाश्वत विकास व त्याला संलग्न बाबींचा विचार प्रखरतेने नजरेसमोर येतो. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, तर राज्यात २७,९५१ ग्रामपंचायत आहेत व यातील शेकडो गावे आज विकास केंद्रे बनत शहरीकरणाकडे जलद गतीने वाटचाल करीत आहेत.
शेतीची जीवनरेखा म्हणजे माती
अशा गावांचा विकास हा ग्राम पंचायत विकास आराखाड्यावर (जीपीडीपी) अवलंबून असतो. खऱ्या अर्थाने सुशासन व त्याचे फायदे तळागाळातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर ग्रामीण विकास हा शाश्वत आणि आर्थिक विकास हा मजबूत झालाच पाहिजे. हा विकास सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा लोकनियुक्त नेत्यांच्या व त्यांना निवडून देणाऱ्या नागरिकांच्या हातात असतो. तसेच, कोणताही विकास आराखडा पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक व शाश्वत परिणामासाठी बनवायचा असेल, तर तो शास्त्रीय माहितीच्या आधारावर तयार करावा लागतो. त्यामध्ये खालील बाबींचा विचार करावा लागतो. आपल्या सभोवतालची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, पाणी व जलसंधारणची अवस्था काय आहे? पूर्वी तिथे पाण्याचा साठा किती असायचा व आता किती आहे, पर्जन्यमान पूर्वी किती होते व आता किती आहे? शेतीची जीवनरेखा म्हणजे माती, अर्थातच मृदा, ती कशा अवस्थेमध्ये आहे? गावचे पाणलोट क्षेत्र किती व कसे आहे, कोठून मातीची झीज जास्त होऊन नदी-ओढ्यांमध्ये व तलावामध्ये गाळ साठतोय? तिथे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? मृदा व जलसंधारणाची कोणती कामे कोठे व कशी केली पाहिजेत? कोणती पिके कोठे घेतली पाहिजेत? शेतीचे उत्पन्न दर एकरी पूर्वीइतके आहेत की घटले आहेत? आपल्या गावांना कोणत्या संकटांपासून धोका असू शकतो व त्याची कारण-मीमांसा, अशा सर्व बाबींचे अवलोकन केल्याविना जेव्हा एखादा ग्रामविकास आराखडा बनतो, तेव्हा तो परिणामकारक व शाश्वत असू शकत नाही.
त्यामुळे गरजेचे आहे की आपण आपले गाव व आपला प्रदेश भौगोलिक व नैसर्गिक संसाधनांच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे जाणून घ्यावा. परंतु आपले गाव आपण पूर्णपणे जाणता का? हा प्रश्न विचारल्यावर सहजच उत्तर येते, “हो, माझे गाव मी पूर्ण जाणतो.” पण, मग पुढे जर असा प्रश्न विचारला की सद्यस्थितीमध्ये तुमच्या गावामध्ये एखाद्या पिकाची किती एकर लागवड आहे व त्यासाठी पाण्याचा उपलब्ध साठा किती आहे, तर बरेच जण उत्तर देऊ शकत नाहीत. तसेच, जर विचारले की सध्या तुमच्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये किती क्षेत्रावर पाणी आहे आणि हे क्षेत्रफळ दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमी किंवा जास्त आहे का, तरीही बरेच जण उत्तर देऊ शकत नाहीत.
चार दशकांपासून भारत अवकाश तंत्रज्ञानात खूप प्रगती करतो आहे
गेल्या चार दशकांपासून भारत अवकाश तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगती करतो आहे. आपण चंद्रावर यान उतरविले, मंगळाभोवती प्रदक्षिणा घातल्या, एवढेच नाही, तर आदित्य एल-वन उपग्रह आपण अवकाशात स्थिर करून सूर्याचा अभ्यास सुरू केला आहे. परंतु याच अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग भारताच्या मूलभूत अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या ग्रामीण भागासाठी तितकासा परिणामकारक झाला नाहीये. याचे कारण म्हणजे लोकनियुक्त नेतृत्वापर्यंत हे ज्ञान पोहोचले नाही. त्यामुळे ग्रामविकास आराखडा बनविण्यासाठी गेल्या चार दशकांमध्ये संकलित केलेली इत्यंभूत भौगोलिक माहिती कितीतरी संगणक प्रणालींमध्ये आणि संकेतस्थळांवर उपलब्ध असतानादेखील ती ग्रामविकासासाठी परिणामकारकरित्या वापरली जात नाही.
ही ग्रामीण विकासासाठी अत्यावश्यक असणारी मूलभूत माहिती अवकाश तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या पृथ्वी निरीक्षणातून आपणास अचूकतेने आणि योग्य वेळेमध्ये मिळते. ही माहिती भौगोलिक सूचना प्रणालीद्वारे भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या (जिओस्पॅशल टेक्नोलॉजी) रूपात सहज उपलब्ध आहे. या विषयीची माहिती पंचायत राज रचनेमधल्या नेतृत्वापर्यंत पोहोचावी म्हणूनच ‘स्पेस फॉर गुड गव्हर्नन्स’ म्हणजेच ‘सुशासनासाठी अवकाश तंत्रज्ञान’ या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन रामभाऊ माळगी प्रबोधिनी, अर्थ साईट फाउंडेशन व स्ट्रॅटेजिक रिसर्च अँड ग्रोथ फौन्डेशन (एसआरजीएफ) यांनी ६ व ७ मार्च रोजी संयुक्तपणे केले आहे.
या पूर्वी रामभाऊ माळगी प्रबोधिनी व अर्थसाईट फाउंडेशनने स्थानिक नेतृत्वासाठी ‘उपग्रह आपल्या हाती’ हे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण वर्ग राष्ट्रीय महिला आयोगासोबत देशातील सहा राज्यांमध्ये महिलांसाठी आयोजित केले होते. यातून असे निदर्शनास आले की या महिला नेतृत्वास ज्ञानाची प्रचंड भूक आहे. हे तंत्रज्ञान व माहिती जाणून घेतल्यावर त्यांना असे वाटले की हे जर पूर्वीपासून उपलब्ध असते, तर आज कित्येक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली वाताहात किंवा उपजीविकेचे साधन नष्ट झाल्यामुळे गावच्या तरुण वर्गाने शहराची वाट धरणे यांसारख्या परिस्थिती उद्भवल्या नसत्या.
सद्यस्थितीमध्ये तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की हजारो उपग्रह आज अवकाशात फिरत आहेत व रोज पृथ्वीचे निरीक्षण होते आहे. ही माहिती आपल्याला विनामूल्य उपलब्ध होते. एआय / एमएलसारखे तंत्रज्ञान व भ्रमणध्वनीमुळे या माहितीपासून मिळणारे आकडे आपल्याला सहज व योग्य वेळी उपलब्ध होतात आणि भूस्थानिक प्रणालीद्वारे नकाशाच्या स्वरूपात वापरता येतात. हे तंत्रज्ञान जर पंचायत राज रचनेमधल्या नेतृत्वास व त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व गैरसरकारी व सरकारी संस्थांस समजले, त्याचा पूर्ण वापर करून प्रत्येक गावचा विकास आराखडा योग्य रीतीने तयार केला आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली, तर ग्रामविकास हा नक्कीच शाश्वत पद्धतीने होईल. यातून जेव्हा सर्व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होईल, तेव्हा भारत खऱ्या अर्थाने संपन्न होईल.
(लेखक अर्थसाईट फाउंडेशनचे संस्थापक असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनिच्या पाठ्यवृत्ती योजनेचे मार्गदर्शक आहेत, तसेच संयुक्त राष्ट्र संघाचे पूर्व-अधिकारी होते.)