मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून या घटनेवरून रोष व्यक्त केला जात आहे. हा रोष पाहून मणिपूरमधील प्रशासकीय सूत्र हलू लागली आहेत. गेल्या दोन दिवसात मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु याआधी अनेक उच्चस्तरीय बैठकाही होऊनही गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल ६२ हे प्रकरण धुळखात पडलं होतं. ६२ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी कोणतीही मोठी कारवाई झाली नव्हती. त्यामुळे मणिपूर सरकारचा निषेध केला जात आहे.

मणिपूरमधील या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. आज थेट महाराष्ट्राच्या विधीमंडळात या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांमधील महिला आमदारांनी मणिपूर प्रकरणावर बोलण्याची परवानगी मागितली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ही परवानगी नकारल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध नोंदवला.

विधीमंडळाबाहेर पडल्यानंतर मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मणिपूरमधील घटनेचा निषेध नोंदवला. तसेच सभात्याग करण्याचं कारणही सांगितलं.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तिथे दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली. त्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितला. परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. मणिपूरच्या घटनेचा देशभरातील लोक निषेध करत आहेत. आम्हाला वाटतं की, विधीमंडळाच्या माध्यमातून याबाबत एक ठराव झाला पाहिजे. त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. यासंदर्भात ठराव व्हावा, अशी भावना आम्ही व्यक्त केली. परंतु आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही. विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही यासाठी पाच मिनिटं मागितली. परंतु आम्हाला वेळ दिला नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, मणिपूरमधील घटनेसंदर्भात बोलण्याची संधी द्यावी, यासाठी केवळ पाच मिनिटं द्यावी अशी विनंती आम्ही अध्यक्षांकडे सातत्याने केली. परंतु दुर्दैवाने यासंदर्भात बोलण्यासाठी आम्हाला पाच मिनिटंसुद्धा दिली गेली नाहीत. आम्ही महिला सदस्य सातत्याने बोलण्याची परवानगी मागत होतो. एक मिनिट द्या म्हणत होतो, परंतु अध्यक्षांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही, आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा निषेध करून आम्ही विधीमंडळातून बाहेर पडलो.

हे ही वाचा >> “अजित पवार फार दिवस…”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “शिंदे गटाने आता स्वीकारावं…”

“…तर मोठं महाभारत घडेल”; यशोमती ठाकूर

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, “या देशात महिलांचा सन्मान होत नसेल तर मोठं महाभारत घडणार आहे, हे सत्य आहे. आम्ही महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु या विधीमंडळाने आम्हाला एक सेकंदही बोलू दिलं नाही. हीच का आपल्या देशातली लोकशाही? खरंतर ही लोकशाही नव्हे हुकूमशाही आहे.” दुसऱ्या बाजूला आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला देश कुठे नेऊन ठेवलाय? असा प्रश्न उपस्थित केला. शिंदे यांनीदेखील मणिपूरमधील घटनेचा निषेध नोंदवला.

Story img Loader