सांगली : महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यप्रणाली अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करावी, असे आवाहन मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केले. मिरजेसह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत गतिमान अभियान मिरजेत आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्री. दिघे होते.

प्रशिक्षण शिबिरामध्ये विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी यांना ई चावडी, हिंदू वारसा कायदा, मुस्लिम वारसा कायदा, ई हक्क प्रणाली, ई पीक पाहणी, ६ गठ्ठा पद्धती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सदर प्रशिक्षणाचे वेळी श्री. कोतवाल यांनी हिंदू वारसा कायदा, मुस्लिम वारसा कायदा व हिब्बानामा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच, प्रशिक्षण सत्रानंतर कार्यालयीन आणि क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक अडीअडचणीवर खुली चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कर्मयोगी मिशन अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षणाचे जास्तीत जास्त कोर्स पूर्ण करणारे महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले. समस्यांचे सखोल विश्लेषण करून कार्यप्रणाली अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री. दिघे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मिरज तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अप्पर तहसीलदार वरुटे, तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे, कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे यांच्यासह महसूल विभागाचे विविध अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्राम महसूल अधिकारी संजय खरात यांनी मानले.