सहकारी पतसंस्थेच्या कामकाजासंदर्भात अनुकूल अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडून चार लाख रुपये लाच स्वरूपात स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील विशेष लेखापरीक्षक व साहाय्यक उपलेखारीक्षकास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.  तक्रारदार हे अमळनेर येथील एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. पतसंस्थेचे २०१२-१३ वर्षांचे वार्षिक परीक्षण विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक अशोक नथ्थू पाटील हे करीत आहेत. या परीक्षणावरून पतसंस्थेचे माजी व विद्यमान अध्यक्ष, संचालक व सचिव यांच्याविरुद्ध कर्ज व अनियमितता, यासंदर्भात नोटीस काढण्यात आली होती. या नोटीसला माजी व विद्यमान अध्यक्ष, संचालक व सचिव यांनी उत्तरे दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न करता अनुकूल अहवाल देण्यासाठी अशोक पाटील व साहाय्यक उपलेखापरीक्षक भास्कर हिंमत पवार (४५) या दोघांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती चार लाख रुपये देण्याचे ठरले. गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजता पारोळा येथील दुकानात ही रक्कम अशोक पाटील हे भास्कर पवार यांच्या वतीने स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.