अहिल्यानगर : चांगले काम करताना तक्रारी झाल्या तरी पोलिसांचा हेतू शुद्ध असेल तर वरिष्ठ अधिकारी पाठीशी उभे राहतील, मात्र चुकीचे वर्तन करणाऱ्याला माफी नाही. खाकी वर्दीला डाग लागेल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी आज, मंगळवारी पोलिसांच्या जनता दरबारात स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्यावर आले होते. आज सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कवायतीचे व मुख्यालयाच्या परिसराची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर आयोजित पोलीस दरबारात त्यांनी पोलिसांचे प्रबोधन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कुलबर्मे तसेच पोलीस उपअधीक्षक, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्था राखताना काहीवेळा लोक पोलिसांवर नाराज होतात, पण चांगले काम सुरू ठेवा. पोलीस खाते हे आपले कुटुंब आहे. त्यातच आपली ताकद आहे. आपण एकत्रित राहिलो तर अधिक बळकट होऊ, असे सांगताना त्यांनी पोलीस दलाला एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

पोलीस दलातील तणावपूर्ण वातावरणामुळे अनेकांना आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. त्यामुळे नोकरी करताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असाही सल्ला त्यांनी दिला. पोलीस मुख्यालयातील मेसमध्ये यापूर्वी पोलिसांना समाधानकारक जेवण मिळत नव्हते, मात्र पोलीस अधीक्षक ओला यांनी याकडे लक्ष दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून चांगले जेवण मिळत असल्याचे पोलिस अंमलदारांनी सांगितले.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्ती

पोलीस दरबारात विशेष महानिरीक्षक कराळे यांच्यापुढे पुरुष व महिला अंमलदारांनी विविध स्वरूपाच्या प्रशासकीय व वैयक्तिक अडचणी मांडल्या. वयाची अट ठेवून कवायतीसाठी नियम करावेत, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्त असलेल्या पोलिसांना कार्यमुक्त करा. दहा-वीस-तीसचा वेतन फरक द्यावा, पोलीस बँड पथकाच्या मानधनात वाढ करा, श्वानपतकातील पोलिसांना जोखीम भत्ता मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेत महानिरीक्षक कराळे व पोलिस अधीक्षक ओला यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

निवडणूक काळातील कामाचे कौतुक

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोणतीही मोठी अनुचित घटना घडू न देता शांततेत निवडणुका पार पाडल्या. धार्मिक व जातीय तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली, याबद्दल विशेष महानिरीक्षक कराळे यांनी पोलीस अधीक्षक ओला व जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन केले. पुढील काळातही ही कामगिरी कायम ठेवा अशीही सूचना त्यांनी केली.