नांदेड : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्रातर्फे विशेष व्याख्यानमाला दिनांक २ मार्च ते ९ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सदरील व्याख्यानमालेचा मुख्य विषय “नरहर कुरुंदकर यांच्या विचारातील संवैधानिक मूल्ये” हा असेल. नांदेड मधील कुरुंदकर चाहते आणि संविधान प्रेमींसाठी ही मोठी वैचारिक पर्वणी आहे.
प्रा. नरहर कुरुंदकर यांनी आपल्या लेखणी आणि वाणीद्वारे भारतीय राज्यघटनेने ज्या मूल्यांचा आग्रह धरला त्यांचा नेहमी पुरस्कार केला. किंबहुना तेच त्यांच्या साहित्याचे विशेषतः राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरील लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या विचारधनातील संवैधानिक मूल्यांच्या आग्रहाचे स्वरूप नेमके काय होते तसेच त्यांचे या मूल्यांचे आकलन काय होते हे लोकांसमोर येणे आवश्यक आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत.
२ मार्च २०२५ रोजी डाॅ. श्रीरंजन आवटे पुणे, यांचे या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान होईल. ते ‘भारतीय संविधानवादाचे स्वरूप आणि दिशा’ या विषयावर बोलतील. वरील सर्व व्याख्याने ही पीपल्स काॅलेज परिसरातील नरहर कुरुंदकर स्मारकामध्ये सायंकाळी ६.०० वाजता होतील. या व्याख्यानमालेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा. सौ. श्यामल पत्की, केंद्राचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, केंद्राचे संचालक डाॅ. यशवंत जोशी आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डाॅ. विठ्ठल दहिफळे यांनी केले आहे.
४ मार्च ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होणारी व्याख्याने
४ मार्च, किशोर बेडकिहाळ (सातारा)- नरहर कुरुंदकर आणि सेक्युलॅरिझम, ५ मार्च, डाॅ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर)- नरहर कुरुंदकर यांची इतिहासमीमांसा, ६ मार्च, लोकेश शेवडे (नाशिक)- नरहर कुरुंदकर आणि समाजवाद, ७ मार्च, डाॅ. नागोराव कुंभार (लातूर)- नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनातील स्वातंत्र्यविषयक विचार, ८ मार्च, डाॅ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर)- नरहर कुरुंदकर यांचा विवेकवाद; आणि ९ मार्च, डाॅ. विठ्ठल दहिफळे (नांदेड)- नरहर कुरुंदकर यांचा लोकशाही विचार.