शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून दोन्ही गटांमधील संघर्षही अद्याप संपलेला नाही. त्यातच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदतही संपत आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही गटांकडून बाळासाहेबांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी एक पोस्ट ट्वीटर आणि फेसबुकला शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
अरविंद सावंत म्हणतात, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन…! करण्या अवतार कार्य चंद्र सूर्य ताऱ्यांनो, वादळी वाऱ्यांनो,महाराष्ट्राभिमानी राष्ट्राभिमानी सैनिकांनो, व्हा प्रतिबद्द, घ्या शपथ ! ”
याचबरोबर, “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अवमानीत करणाऱ्यांना, डॉ. बाबासाहेबांच्या संविधांनावर हल्ले करणाऱ्या मतीभ्रष्टांना, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना, राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना, प्रबोधनकार आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या विचार, आचारांचा खरा वारसा जपण्या, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान जपण्या, राष्ट्रधर्म सोडून जातीपाती, प्रांती, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या या राष्ट्र आणि महाराष्ट्रद्रोह्यांना नेस्तनाबूत करण्या, उचला बेल भंडार ! म्हणा, उदो उदो ग अंबाबाई साहेब हीच आमची आपणास ग्वाही…!!!” असंही अरविंद सावंत यांनी म्हणत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे.
उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड झाली. ही सोमवारी संपत आहे. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे गेला आहे. यावर ३० जानेवारी सुनावणी आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोगाचा निर्णय होऊ शकतो.