‘युतीचे मढे का मेले हे का सांगत आहात’ असा सवाल करीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुकीत ७० पेक्षा अधिक जागा कोणत्याही पक्षाला मिळू शकणार नाहीत, असे भाकीत वर्तविले. येथे भाकपचे भालचंद्र कानगो यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी संध्याकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
कोळसा घोटाळ्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाची त्यांनी वाट पाहिली. जे न्यायालयाने केले ते मोदींनी का केले नाही, असा सवाल करीत त्यांनी भाजपवर टीका केली. सर्वसामान्यांचे ‘अच्छे दिन’ नाही, तर भांडवलदार व उद्योजकांसाठी चांगले दिवस आल्याचे आंबेडकर म्हणाले.
महराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे पुढारी कंत्राटदार असल्याने विकास म्हणजे एफएसआय, इमारती असेच चित्र निर्माण झाले. ‘कोंबडय़ांच्या सभेचा अध्यक्ष बोका केल्यावर काय होईल,’ असे विचारत त्यांनी अन्य पक्षाला मतदान करणे कसे चुकीचे ठरेल, हे सांगितले. सध्या शिवसेना-भाजपचे नेते युतीचे मढे का मेले हे सांगण्यात मग्न आहेत. त्यांनी विकासाची त्यांची भूमिका सांगावी. मात्र, जाती-धर्माच्या नावार फूट पाडत त्यांना राजकारण करायचे असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
साडेपाचशे कोटींचे कर्ज नि दीर्घ श्वास!
शहरी भागातील समस्या शिवसेना-भाजपमुळे निर्माण झाल्याचे सांगताना आंबेडकर यांनी औरंगाबाद महापालिकेवर ५५० कोटींचे कर्ज असल्याचे सांगितले. मात्र, एवढय़ा मोठय़ा कर्जात असणाऱ्या महापालिकेचा एक तरी नगरसेवक कंगाल आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नानंतर त्यांनी दीर्घ श्वास घेतला. भाषण काही वेळ थांबलेच. त्या वक्तव्यावर हशा पिकला. नगरसेवक अमित भुईगळही वरमले. मागे-पुढे पाहून त्यांनी वेळ मारून नेली.

Story img Loader