सांगली : बसस्थानकावर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव टँकरने धडक दिल्याने एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना गुहागर-विजयपूर महामार्गावरील धावडवाडी (ता. जत) येथे घडली. अपघातानंतर पलायनच्या प्रयत्नात असलेल्या टँकर चालकांला नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुहागर विजयपूर महामार्गावर धावडवाडी हे गाव आहे. या गावाचे बसस्थानक महामार्गालगत आहे. या बसथांब्यावर उभ्या असलेल्या अहमदअली बाबासाहेब शेख (वय ५६ रा. मुंबई) याला पहिल्यांदा ठोकरले. यात ते जागीच ठार झाले. या दुर्घटनेनंतर टँकर तसाच पुढे गेला आणि दुचाकीला ठोकरले. यामध्ये दुचाकीवरील दुर्योधन तानाजी कोळेकर (वय २१) आणि किरण मनोहर सुर्यवंशी (वय २२, दोघेही रा. धावडवाडी) हे दोन तरूण जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
हेही वाचा…“…तर छगन भुजबळांना मुख्यमंत्री पदाचा टीळा लागला असता”; संजय राऊत यांचं मोठं विधान
अपघातानंतर टँकर चालक सुसाट पसार झाला.मात्र, नागरिकांनी दुचाकीवरून पाठलाग करून त्याला पकडले. आणि जत पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातात मृत झालेले शेख हे मूळचे धावडवाडीचे असून ते मुंबईमध्ये बेस्ट कर्मचारी आहेत. ईदसाठी ते गावी आले होते.अपघातात त्यांचा मृत्यू झाला.