रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून मुरुड नगर परिषदेच्या इमारतीतच काम चांगले झाले आहे. मात्र शासनाकडे सारखे पैसे मागू नका, कारण सर्वच विकासकामे करण्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नाही, त्यामुळे आपण जे कमवतो त्यातील काही भाग समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी वापरला गेला पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. ते मुरुड नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
समाजात दातृत्वाची वृत्ती वाढली पाहिजे. आपण जे कमवतो त्याचा केवळ संचय न करता समाजाच्या हितासाठी त्यातील काही निधी वापरला गेला पाहिजे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले. माझे बालपण या शहरात गेले आहे, त्यामुळे या शहरासाठी माजी काहीतरी करण्याची इच्छा आहे. जर एखादे चांगले काम मुरुडकरांनी हाती घेतले तर त्यासाठी आपणही मदत करू असे प्रतिपादन नाना पाटेकर यांनी केले. मुरुड हे एक चांगले पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे हे शहर स्वच्छ आणि सुंदर राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुरुडमधल्या लोकांनी आपल्या जागा विकू नयेत असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे उपस्थित होते. मुरुड शहरासाठी नवनवीन योजना तयार कराव्यात त्यासाठी आवश्यक निधी आपण उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले. मुरुडबद्दल नाना पाटेकर यांच्या भावना अपेक्षितच आहेत, कारण खडतर परिस्थितीला सामोरे जात त्यांनी हे यश संपादन केले आहे. नानांनी राजकारणात येऊ नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला, कारण नाना पाटेकरांसारखा स्पष्टवक्ता राजकारणात आला तर तो राजकीय पक्षांना आणि राजकीय लोकांना त्रासदायक ठरेल असे तटकरे म्हणाले. आणि जर पुढे-मागे नानांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर त्यांनी राष्ट्रवादीत यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
मुरुडच्या नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी वाघुली डॅम, अलकापुरी रीसॉर्ट आणि महिला रुग्णालयाच्या प्रश्नावर तटकरे यांना लक्ष घालण्याची विनंती केली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एच.के. जावळे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, रोह्य़ाचे नगराध्यक्ष अवधुत तटकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते, मात्र ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली त्यामुळे उपस्थित लोक आणि पक्ष कार्यकर्ते नाराज झाले.
शासनाकडे सारखे पैसे मागण्यापेक्षा स्वत:चा पैसाही समाजासाठी वापरा – नाना पाटेकर
रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून मुरुड नगर परिषदेच्या इमारतीतच काम चांगले झाले आहे. मात्र शासनाकडे सारखे पैसे मागू नका, कारण सर्वच विकासकामे करण्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नाही.
First published on: 17-06-2013 at 05:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spend own money for society insted of always asking money to government nana patekar