रत्नागिरी : भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज भाजप रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती मशाल घेतली. मात्र बाळ माने यांच्या पक्ष प्रवेशाने रत्नागिरीतील इच्छुक निष्ठावंत नाराज झाल्याने शिवसेना ठाकरे गटात काय घडामोडी घडणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीतून उमेदवारीसाठी बाळ माने उत्सुक होते. मात्र रत्नागिरीत उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित झाल्याने बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णया विरोधात आमदार चित्रा वाघ तसेच बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांची मनधरणी केली होती. तरीही भाजपचे बाळ माने शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्यांना आता रत्नागिरीची उमेदवारी देखील देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा… संभाजी ब्रिगेड ५० जागा लढविणार
भाजपाचे माजी आमदार बाळ माने हे गेले अनेक वर्षे भाजपमध्ये काम करत आहेत. बाळ माने यांनी १९९९ साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ अशा तीन निवडणुकांमध्ये उदय सामंत आणि बाळ माने यांनी एकमेकांविरोधात निवडणुकी लढल्या. त्यात बाळ माने यांचा सलग तीनवेळा पराभव झाला. लोकसभा निवडणुकांआधी बाळ माने सक्रिय होवून त्यांनी भाजपचा प्रचार सुरू केला.
हे ही वाचा… कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे !
विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्यासाठी बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. यावेळी भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली. मात्र या मतदार संघातील आमदार महायुतीचाच असल्याने ही जागा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांना जाणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गट किंवा अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी माने यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार विनायक राऊत, माधवी माने, भास्कर जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव, बाळ माने यांचे सुपुत्र विराज आणि मिहीर माने उपस्थित होते.