राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सांगली जिल्ह्यातील संघटनेची परिस्थिती वाईट आहे. राष्ट्रवादीला तर शाखेपासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते. तशी सूज राष्ट्रवादील गेल्या अडीच वर्षांत आली होती. पण, सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरून गेली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. ते सांगलीत भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. “सांगली हा प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असून, ते स्वत:च निवडून येऊ शकतात. तासगावमध्ये सुमन पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे त्यांच्या हिंमतीवर निवडून येतात. जयंत पाटील यांच्या पाठीमागे फक्त प्राजक्त तनपुरे आहे, बाकी कोण नाही,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

हेही वाचा : विभक्त पतीचा ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त प्रवेश; सुषमा अंधारे म्हणाल्या…

“सत्तेत असताना राष्ट्रवादीला भाजपाचा एकही आमदार फोडता आला नाही. भाजपा हा विचारांवर प्रेरित होऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र, सरकार गेल्यावर इतकी चुळबूळ झाली की, पवार घराण्यातच फूट पडते, असं वातावरण निर्माण झालं. तुम्ही राज्यातली एवढी घर फोडली आहे, त्यामुळे जे पेरलं तेच उगवणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धारही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.