महसूल विभागीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन
खेळांचे महत्त्व तितकेच असल्याने या स्पर्धेनंतर दुष्काळग्रस्तांची कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र राज्य महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना या स्पर्धेमुळे नवी उभारी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी महसूल विभागावरच शासनाच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जात असल्याने या विभागातील अधिकाऱ्यांना कायम तणावाखाली वावरावे लागते. या तणावातून काही काळ मुक्ती मिळविण्यासाठी अशा स्पर्धाची गरज असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे यांनी या स्पर्धेनिमित्ताने हे नीटनेटके मैदान तयार झाले, परंतु ते केवळ स्पर्धेपुरतेच न राहता कायम अशाच प्रकारचे राहील आणि त्यावर स्थानिक खेळाडू सराव करतील याची जबाबदारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह आठही विभागांतील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी  उपस्थित होते. नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, अंजना ठमके, वीजेंद्र सिंग यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी नंदुरबारच्या कला पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Story img Loader