पर्जन्यरोपणासाठी आवश्यक असणारे सी डॉप्लर रडार गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे दाखल झाले. दुपापर्यंत ते उभारण्यासाठी हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. दिवसभरात नगर, सांगली, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ांमध्ये ढग दिसतात का, याची पाहणी करण्यासाठी दोन वेळा विमान उड्डाणे झाली. पर्जन्यरोपणाचा प्रयोग कोठे झाला आणि किती फ्लेअर्सचा उपयोग करण्यात आला, याची माहिती उशिरापर्यंत आली नव्हती.
रविवापर्यंत सी डॉप्लरची यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार रामवीर शर्मा यांनी सांगितले. सी डॉप्लर रडार यंत्रणेमुळे पावसाचा अचूक वेध घेता येईल, असा दावा केला जात आहे. रेडिओ वेब डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे रडार. या यंत्राच्या साह्य़ाने ढग किती लांब आहेत, ते कोणत्या दिशेने जात आहेत, त्यांचा वेग काय, याची माहिती अचूकपणे मिळू शकेल.
साधारणत: पावसाचे ढग तीन स्तरामध्ये पाहिले जातात. लघु, मध्यम आणि उंच स्तरातील ढगांची रचना पाहून त्यावर रसायनांचा मारा केला जातो. तो अचूक व्हावा, या साठी रडार प्रणाली अधिक फायदेशीर असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. दरम्यान, पहिल्या सत्रात सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी कृत्रिम पावसासाठी नगर जिल्ह्य़ातील राहुरी परिसर, उस्मानाबाद, लातूर व बीड परिसरात विमानाने पर्जन्यरोपण केले. लगेच दुपारच्या सत्रात सोलापूर, सांगली, नगर व औरंगाबाद या जिल्ह्य़ांतही हा प्रयोग हाती घेण्यात आला, मात्र, तो नक्की कोठे हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा