जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या दलित युवकाच्या निर्घृण हत्येला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ जामखेड येथे शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलनही केले.
खर्डा येथील दोन कुटुंबातील वादाला जातीय व राजकीय रंग देऊ नये तसेच पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  गंगाधर काळकुटे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे, उपमहाराष्ट्र केसरी बबनराव काशिद, पं. स.चे सभापती डॉ. भगवान मुरूमकर, उपसभापती दीपक  पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, राष्ट्रवादीचे दत्तात्रय वारे, जामखेडचे सरपंच कैलास माने, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष वैजिनाथ लोंढे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, विजयसिंह गोलेकर आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.
तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. खर्डा येथील आगे खून प्रकरण जितके निंदनीय आहे, तितकेच राजकीय पुढा-यांचे वागणेही निंदनीय आहे. त्यांनीच या प्रकरणाला जातीय रंग दिला. अशांचा निषेध करतानाच या प्रकरणी पत्रकार वागळे व दीप्ती राऊत यांच्यासह रिपाइंचे सुनील साळवे यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी या सभेत वक्त्यांनी केली. पीडित मुलीसह कुटुंबाचे पुर्नवसन करावे, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, छेडछाडीच्या कृत्याला प्रेमप्रकरणाचा रंग देऊन मुलीची बदनामी करणा-यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, या घटनेतील निरपराध असणा-यांना पोलिसांनी सोडून द्यावे, निरपराध असणा-या न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांची चौकशीच्या नावाखाली विनाकारण सुरू असलेली छळवणूक थांबवावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. माहिती व प्रसारण विभागाकडून मार्गदर्शन घेऊन पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या मागे घेतला.

Story img Loader