राजकीय दबावातूनच परिवहन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेली शहरातील बस वाहतूक सेवा बंद करण्याची नोटीस पाठवल्याचा आरोप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आरटीओ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी रीतसर परवाना घेऊनच बससेवा सुरू करावी, अशी सूचना केली आहे.
महापालिकेची बससेवा बंद झाल्याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने नागरिकांसाठी शहरात सोमवारपासून बससेवा सुरू केली. मात्र ती विनापरवाना असल्याने आरटीओंनी बसमालकाला नोटीस बजावली, त्यामुळे कालपासून ही सेवा बंद झाली. त्याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पदाधिकारी सचिन डफळ, संजय झिंजे, गिरीश जाधव, नितीन भुतारे, मनोज राऊत, जगदीश बुऱ्हाडे, घनश्याम गोडळकर, सुनील नागापुरे, राम धोत्रे, अशोक दातरंगे, संतोष जाधव आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
राजकीय दबावातूनच अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून नोटीस पाठवली असा आरोप करून डफळ यांनी हीच तत्परता अधिकाऱ्यांनी अवैध व बेकायदा वाहतूक बंद करण्यासाठी दाखवावी, मनसेने नागरिकांच्या सोयीसाठी मोफत बससेवा सुरू केली होती. नोटिशीमुळे आनंद ट्रॅव्हल्सने बस देण्यास नकार दिला. विनामूल्य बससेवा देणे गैर असेल तर जिल्हय़ातील बेकायदा प्रवासी वाहतूक बंद करावी, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
बससेवेअभावी महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत, रिक्षाचालक मनमानी करत अवाजवी दर आकारत आहेत, त्यामुळे मनसे पदाधिकारी शांत बसणार नाहीत, अडचणींवर तोडगा काढून पुन्हा बससेवा सुरू करू, असे झिंजे यांनी सांगितले.
बससेवा सुरू करण्यासाठी रीतसर परवाना घ्यावा, त्यासाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व आरटीओ यांच्या समितीची सभा होणे आवश्यक आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader