येथील नरेंद्र डोंगरावर श्रीलंकन फ्रॉगमाऊथ (श्रीलंका बेडूकमुखी) पक्षी प्रथमच दिसला. हा पक्षी वाइल्ड कोकणचे महेंद्र पटेकर यांनी कॅमराबद्ध केला आहे. हा पक्षी पश्चिम घाटात गोवा, कर्नाटक व केरळमध्ये आढळतो. श्रीलंका बेडूकमुखी फ्रॉगमाऊथ पक्ष्याची चोच व डोके बेडकाच्या डोक्याप्रमाणे असते. त्यामुळे या पक्ष्याला बेडूकमुखी असे म्हटले जाते. हा पक्षी पश्चिम घाटातच आढळून येतो. आंबोलीत हा पक्षी आढळत असल्याची नोंद आहे, अशी माहिती बीएनएचएस संस्थेचे पक्षी निरीक्षक नंदकिशोर दुधे यांनी दिली. या पक्षी निरीक्षणासाठी नंदकिशोर दुधे, महेंद्र पटेकर दोन दिवसांपूर्वी गेले असता या पक्ष्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांना आवाज आला पण पक्ष्याचे दर्शन घडले नव्हते. त्यामुळे गुरुवारी वाइल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर, डॉ. गणेश मर्गज, सुभाष पुराणिक, विघ्नेश सापळे, महेंद्र पटेकर व शुभम पुराणिक यांच्या टीमने संध्याकाळी ५ वा. सव्र्हे केला असता पक्ष्याचे दर्शन घडले.
या टीमला श्रीलंकन बेडूकमुखी दोन पक्षी दिसले. हा पक्षी निशाचर असून तो राठवा जातीच्या पक्ष्याच्या कुळातील आहे. दिवसा दाट जंगलामध्ये बसलेला आढळतो. या पक्ष्याच्या दर्शनामुळे नरेंद्र डोंगरावर असलेल्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन अधोरेखित झाले आहे.
पक्षी अभ्यास आणि निरीक्षण कसे करावे यासाठी बीएनएचएस या संस्थेचे नंदकिशोर दुधे खास सावंतवाडीत आले होते. त्यांनी सावंतवाडी विश्रामगृह ते नरेंद्र डोंगर असा सव्र्हे केला. त्याच्यासोबत पक्षिमित्र आणि वाइल्ड कोकणचे पदाधिकारी उपस्थित होते. या पक्षी निरीक्षणात विविध जातीचे ६० पक्षी आढळून आले. या पक्ष्यांना कॅमराबद्धदेखील करण्यात आले. या पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशीलतेमुळे पक्षी सहज दिसत असल्याचे सांगण्यात आले.
नरेंद्र डोंगरावर आढळला श्रीलंकन पक्षी
श्रीलंका बेडूकमुखी फ्रॉगमाऊथ पक्ष्याची चोच व डोके बेडकाच्या डोक्याप्रमाणे असते.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 25-10-2015 at 02:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lankan birds found on narendra mountain