अलिबाग– लोकशाहीत प्रत्येकाला आपली राजकीय भुमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण श्रीनिवास पवार यांनी आमचे नेते अजित पवार यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. ते ज्या भाषेत बोलले ती भाषा योग्य नव्हती अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते मुरूड येथे बोलत होते.
हेही वाचा >>> राज ठाकरे महायुतीत जाण्याची चर्चा; रोहित पवार म्हणतात, “धाडसीपणाने लढणाऱ्या नेत्यांनी…”
बारामती येथे बोलतांना श्रीनिवास पवार यांच्याकडून अजित पवार यांच्यावर टिका करण्यात आली होती. या टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आले आहेत. कोणी कितीही टिका केली तरी बारामती मतदारसंघ आणि महाराष्ट्र अजित पवार यांच्या पाठीशी उभा आहे असे मत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. काही दिवसापूर्वीच आमचे नेते अजित पवार यांनी बारामतीत त्यांना एकटे पाडले जात असल्याचे म्हटले होते. पण बारामतीची जनता त्यांना एकटे पडू देणार नाही. अजित पवार काय आहेत हे महाराष्ट्रातील जनतेनी गेल्या ३८ वर्षात अनुभवले आहे असेही तटकरे म्हणाले. दरम्यान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील यांनी अजित पवार यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. ज्यांच्या नावातच अजित आहे, त्यांना कोण एकटे पाडणार असा सवाल त्यांनी केला आहे. अजित पवार हे राजकारणातले दादा आहेत. त्यामुळे त्यांची भिती लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. पण कोणी कितीही प्रयत्न केले तरी या सगळ्यातून ते यशस्वीपणे बाहेर पडतील असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.