राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले आहे. या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलत असताना एक वादग्रस्त विधान केले आहे. “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात हे विधान केल्यानंतर शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, याचा आव्हाड यांनी पुनरुच्चार केला.

आपल्या विधानाला जोड देत असताना आव्हाड यांनी मानववंशशास्त्राचे दाखले दिले. हजारो वर्षांपूर्वी ज्यावेळी दुसरे काही खाद्य पिकत नव्हते, तेव्हा सर्व लोक मांसाहारी होते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अभ्यास करून राजकारणात बोलावे, असाही सल्ला त्यांनी इतरांना दिला.

हे वाचा >> “प्रभू राम सगळ्यांचा! तुम्ही त्याचे मालक नाही, आमंत्रणं देऊन मार्केटिंग…”, जितेंद्र आव्हाड यांची भाजपावर टीका

जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेचे उदघाटन आणि राम मंदिर उदघाटनापासून दूर ठेवल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “राम मंदिराबाबत आता राजकारण होताना दिसत आहे. रामाचे सगळ्यात जास्त जवळचे नाते हे शबरीचे होते. राम मंदिर उद्घाटनाला काही नेते स्वतः पुढे पुढे जातात, परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तो मान दिला जात नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. राम भेदभाव न मानणारा होता आणि तुम्ही प्रत्येक उद्घाटनाला राष्ट्रपतींना राजभवनामध्ये बंद करून ठेवता. स्वतः उद्घाटन करायला निघून जाता.”

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आव्हाड म्हणाले, “तोंडात राम आणि मनामध्ये रावण असे आम्ही कधी करत नाही. राम हा तुमच्या बापाचा नाही आणि आमच्याही बापाचा नाही. राम दर्शनाला जाणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, १४ वर्षांचा वनवास फक्त आई-वडिलांच्या इच्छेखातर भोगणारा राम या तिन्ही पक्षांमध्ये असू शकतो का?

“महाराष्ट्रामध्ये अचानक गेल्या सहा महिन्यांपासून सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या की, राम नामाच्या घोषणा होतात आणि दुसरीकडे सामाजिक अस्वस्थता निर्माण होते. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या बारामतीमधील घरासमोर धनगर समाजाचे आंदोलन झाले. तेव्हा भाजपचे नेते म्हणाले होते की, आठवड्याभरात आरक्षण मिळेल. पण अजूनही धनगर समाज आरक्षणासाठी लढत आहे. दुसरीकडे ओबीसींना न्याय देण्याचे काम महाराष्ट्रात आंबेडकरांनंतर कोणी केले असेल तर ते फक्त शरद पवारांनी केले”, आरक्षण आणि सामाजिक प्रश्नावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भूमिका व्यक्त केली.

Story img Loader