दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. मात्र या पाठय़पुस्तकांच्या किमतीत मागील वर्षांपेक्षा तिपटीने वाढ झाली आहे. एकीकडे नवीन अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध झाल्याचा आनंद असतानाच पुस्तकांच्या किमती वाढल्याने आनंदावर विरजण पडले आहे.
दहावीचा नवीन अभ्यासक्रम अमलात आल्यानंतर सर्वच पुस्तके एप्रिलपर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पाठय़पुस्तकनिर्मिती मंडळ-बालभारती केला. नववीच्या परीक्षा आटोपल्यानंतर एप्रिलपासून विद्यार्थ्यांचे उन्हाळी वर्ग सुरू झाले. मात्र त्यासाठी पुस्तके उपलब्ध नव्हती. विद्यार्थी आणि पालकांकडून पुस्तक संचाबाबत विक्रेत्यांकडे विचारणा केली जात होती. सामाजिक शास्त्रे, भूगोल, संस्कृत आणि हिंदीची पुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. गणित आणि विज्ञान वगळता इतर सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. भूगोल सोडून अन्य पुस्तकांत पानांची संख्या वाढली आहे तर इतिहास-भूगोलाची छपाई चार रंगामध्ये आहे.  
पुस्तकांच्या किमती कितीही वाढल्या तरी ती खरेदी करावीच लागतील. अभ्यासक्रम बदलल्यामुळे नवीन पुस्तके आवश्यकच आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या किमतीमध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे शिक्षण खूप महागले आहे.  महागाई बरोबर शिक्षणही महाग होत आहे. त्यामुळे सरकारने पहिली ते दहावीच्या शिक्षणाचा खर्च करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन योजना राबवावी. अभ्यासक्रम बदलल्यामुळे पुस्तकांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. सर्व पुस्तके बाजारात दाखल झाली असून खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी आहे.
दहावी पुस्तकांचे रुक्ष रूप पालटून यंदा त्यांची जागा आकर्षक रंगीत पुस्तकांनी घेतली आहे. तीही ए-फोर आकारात. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी बालभारतीने हा प्रयोग राबवला असला तरी रंगीत छपाईमुळे पुस्तकांच्या किमती तिपटीने वाढविल्या. इंग्रजीच्या पुस्तकात धडे कमी आणि उपक्रम अधिक आहेत. अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित बनवला आहे. कृतिपूर्ण अध्यापनासाठी हा बदल करण्यात आला आहे.