नापिकी,कर्जबाजारी व तोट्यात गेलेल्या शेती व्यवसायाला कंटाळून नांदेडमधील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पतीच्या दुर्देवी मृत्यूनंतर न डगमगता विधवा पत्नीनं दहावीची परीक्षा देत नवा आदर्श समोर ठेवला आहे. आम्‍ही हरलेलो नाही, आमची जिद्द कायम आहे असे म्‍हणत शेतकऱ्यांच्या पत्नीनं दहावीची परीक्षा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांची पत्‍नी सुनिता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे या तीन महिलांनी दहावीची परीक्षा दिली. माध्यमिक शालान्त परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेस राज्यात प्रारंभ झाला आहे. दहावीच्या परीक्षेस नांदेड जिल्ह्यातील १५७ परीक्षा केंद्रांवर सुरूवात झाली असून तब्बल ४७ हजार ६७ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

कर्जबाजारीला कंटाळून नांदेडमील अर्धापूर तालुक्यातील तीन शेतक-यांनी आपलं जीवन संपवलं. घरातील कर्ता पुरूष गेल्यामुळे या शेतक-यांच्या कुटूंबावर संकटाचे डोंगर कोसळले. परंतू पतीच्या आत्महत्येने खचून न जाता, धीर न सोडता परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्हाला शिकायचंय. हरलो नाही तर आता जिंकायचंय म्हणत सुनिता कदम, मंगला इंगोले आणि लक्ष्मी साखरे या तीन महिलांनी शिक्षणाची कास धरली.

घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतरही न डगमगता या महिलांनी नवा आदर्श उभा केला आहे. पोटच्या मुलांना शिक्षण देत स्वत:ही अभ्यास करत तिघींनी दहावीची परीक्षा दिली. या तिघींवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.