महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. राज्यभरातून १७ लाख ४० हजार २९० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक विभागीय मंडळात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी व समुपदेशनासाठी क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मंडळाचे सचिव के. बी. पाटील या वेळी उपस्थित होते. परीक्षेची सर्व दृष्टीने तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या ४० हजाराने वाढली आहे. यंदा परीक्षा देणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ९ लाख ६६ हजार २९१ असून, ७ लाख ७३ हजार ९९९ विद्यार्थिनींचा त्यात समावेश आहे. एकूण २० हजार ५०७ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, परीक्षेसाठी संपूर्ण राज्यामध्ये ३ हजार ८१२ केंद्र आहेत.
परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ासाठी सात याप्रमाणे एकूण २४५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
काही विभागीय मंडळांत विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळनिहाय हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले असून, ते पुढील प्रमाणे-
पुणे- (०२०)६५२९२३१६/७, नागपूर-(०७१२)२५५३५०३, २५६०२०९, औरंगाबाद-(०२४०)२३३४२२८/८४, मुंबई-(०२२) २७८९३७५६, नाशिक-(०२५३)२५९२१४३, कोल्हापूर-(०२३१)२६९६१०१/२, अमरावती-(०७२१)२६६२६०८, लातूर- (०२३८२)२५१७३३, २५१६३३, कोकण-(०२३५२)२३१२५१, २२८४८०.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा