दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकांच्या मसुद्यास राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर पुस्तके छापून बाजारात येईपर्यंत एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे दहावीच्या आगामी वर्षांतील विद्यार्थ्यांना सुट्टीच्या वर्गात पुस्तकांशिवाय अभ्यास करावा लागण्याची शक्यता आहे.
येत्या शैक्षणिक वर्षांपासून दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शास्त्र आणि गणित विषयांच्या पाठय़पुस्तकांमध्ये यापूर्वीच बदल करण्यात आला आहे. मात्र अन्य विषयांच्या पाठय़पुस्तकांचा मसुदा राज्य शिक्षण मंडळाकडून अंतिम करण्यात आला नसल्याचे अभ्यास मंडळातील सदस्यांनी सांगितले. पाठय़पुस्तकाचा मसुदा अंतिम केल्यानंतर प्रत्यक्ष पुस्तके छापून बाजारात येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे शाळांच्या सुट्टीच्या वर्गाना पुस्तकाशिवाय अभ्यास करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी ही शक्यता फेटाळली. ‘पाठय़पुस्तकांचे काम व्यवस्थित सुरू आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाची पुस्तके उपलब्ध होतील,’ असा दावा त्यांनी केला.
दहावीच्या पाठय़पुस्तकांची निर्मिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे केली जाते, तर पुस्तकांची छपाई बालभारती करते. पुस्तकांच्या निर्मितीसाठी प्रत्येक विषयातील तज्ज्ञांचे अभ्यासमंडळ असते. अभ्यासमंडळ पाठय़पुस्तकाचा मसुदा राज्यमंडळाकडे पाठवते. दहावीच्या पुस्तकांच्या साधारण २० लाख प्रतींची छपाई करावी लागते. सहा माध्यमांमध्ये या पुस्तकांची निर्मिती केली जाते. मात्र, अजून अनेक विषयांचा मसुदा अंतिम होऊन तो बालभारतीकडे छपाईसाठी गेलेला नाही.
छपाईला सुरुवात नाही
राज्य मंडळाकडून बालभारतीकडे छपाईसाठी कोणत्याही विषयाचा अंतिम मसुदा देण्यात आलेला नाही. त्यामुळे दहावीच्या पाठय़पुस्तकांची छपाई अजून सुरू झालेली नाही. पाठय़पुस्तकांच्या निर्मितीची नेमकी स्थिती काय आहे, त्याबाबत सध्या काही सांगता येऊ शकत नाही. – गंगाधर मम्हाणे, संचालक, बालभारती