दहावीची परीक्षा सुरू असताना आणि स्वत:ही परीक्षा देत असताना चार विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या भागातून मोटारसायकल लंपास करत असल्याचा प्रकार उघड झाला. संबंधितांकडून चोरलेल्या १२ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोटारसायकल चोरीला जाण्याचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. चोरीच्या या प्रकारात इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी टोळी सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले. महत्त्वाची बाब म्हणजे, इयत्ता दहावीचे सध्या पेपर सुरू आहेत. त्या दरम्यान हे विद्यार्थी मोटारसायकल चोरण्यात मग्न होते. पेपर सुटल्यानंतर हे टोळके मोटारसायकल कशी लंपास करायची याची योजना आखत असल्याचे सांगितले जाते. संबंधितांकडे वेगवेगळ्या मोटारसायकल दिसत असल्याने संशयही बळावला होता. त्यांच्या चौकशीदरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. देवळाली कॅम्प परिसरातील हे विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते. दहावीची परीक्षा देत असताना हे विद्यार्थी मोटारसायकल चोरीचे उद्योग करत होते. संशयितांकडून जवळपास १२ मोटारसायकल जप्त करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले.

Story img Loader