महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला. या वर्षीचा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला. दहावीच्या परीक्षेत काही विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घवघवीत यश मिळताना पाहायला मिळातात. असंच कोल्हापूरच्या एका विद्यार्थ्यांनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात दहावीच्या परक्षेत घवघवीत यश मिळवलं. वडिलांचं छत्र हरपलं, त्यामुळे मुलावर रांगोळी आणि पणत्या, आकाश कंदील विकण्याची वेळ आली. मात्र, तरीही हार न मानता मुलानं दहावीत असे काही गुण मिळवले की, सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. ही गोष्ट आहे, विराज विजय डकरे या विद्यार्थ्याची.
कोल्हापूरमधील रामानंद नगर परिसरात गेल्या १० वर्षांपासून डकरे कुटुंब राहतं. त्यांच्या घरातील परिस्थिती अत्यंत हालाकीची असतानाही विराजचे वडील विजय डकरे यांचं स्वप्न आपल्या मुलांना भरपूर शिकवून अधिकारी बनवण्याचं होतं. त्यासाठी वडील रात्रंदिवस कष्ट करत मुलांना शिकवत. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. मात्र अचानक काळाने घाला घातला आणि विराजच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवलं. वडील विजय डकरे यांचं ऑक्टोंबर २०२३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यावेळी विराज दहावीत जाऊन तीन महिने झाले होते. विराज आणि त्याच्या आईवर कोसळलेल्या या संकटामुळे त्यांच्यासमोर काळोख दिसत होता. मात्र आईने लेकरांचं तोंड बघून जिद्दीने उभं राहत संसाराचा गाडा ओढून न्यायच ठरवलं.
हेही वाचा : डाळिंब शेतीत कष्ट करत सव्वा कोटीचे उत्पन्न घेणारं पोरगं दहावी पास झालं अन् गाव हरकलं
आई रंजना डकरे रात्रंदिवस शिलाई मशीनवर शिवणकाम करण्यास सुरू केलं. १४० रुपये एका कपड्याच्या मागे त्यांना मिळत असतं. महिन्याला चार साडेचार हजार रुपयांत आई कशीबशी घर चालवत होती. विराज दहावीला गेला, त्याच्या शिक्षणासाठी पैसे अपुरे पडत होते. विराज अभ्यासात हुशार होता. यामुळे तो सुट्टीच्या दिवशी आपल्या आईला हातभार लागावा, यासाठी घरोघरी फिरून रांगोळी विकायचा.
दिवाळीच्या सुट्टीत त्याने आकाश कंदील आणि पणत्या विकल्या. पण जिद्द सोडली नाही. तो सुट्टीत दिवसा काम करायचा अन् रात्री अभ्यास करायचा. त्याला शाळेतील शिक्षकही मदत करायचे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या. अवघ्या एक महिना आधी विराजने सर्व काम सोडून मन लावून चिकाटीने रात्रंदिवस अभ्यास केला आणि विराजने दहावीत तब्बल ८३.४० टक्के गुण मिळवले. आईने केलेल्या कष्टाचं त्यानं चीज केलं आणि निकाल लागतात आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यानंतर त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांनीही त्याला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.