अलिबाग– शहापूर पंढरपूर एसटी बसला जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खालापूरजवळ अपघात झाला. कंटेनरने बसला धडक दिल्याने बसमधील ६ प्रवाशी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
खालापूर तालुक्यातील कोलते आणि चौकदरम्यान असलेल्या बापदेव मंदीराजवळ ही दुर्घटना घडली. तीस प्रवाश्यांना घेऊन ही बस ठाणे शहापूर येथून पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास एका कंटेनरने या बसला धडक दिली. ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो समोरच्या बसला जाऊन धडकला.
हेही वाचा – विधानसभेत मविआ किती जागा जिंकेल? शरद पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “२८८ पैकी…”
या अपघातात बसमधील सहा जण जखमी झाले. हनुमंत जगताप, ४३ चालक, गणेश काकडे ५७ रा. उरण, राध्येशाम पवार ५० रा. उरण, गौतम कांबळे २४ रा. उरण, विकास गुप्ता ३६ रा. देहूरोड, सारिका राठोड ३३ रा. सोमटणे हे सहा जण जखमी झाले. खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. खालापूर पोलीस अपघाताची पुढील चौकशी करत आहेत.