बसचालकाला झालेल्या बेदम मारहाणीनंतर अलिबाग आगारातून होणारी एस.टी. वाहतूक कामगार संघटनांनी रोखून धरली. दोषींना अटक होणार नाही तोवर वाहतूक सुरू करणार नाही. अशी आडमुठी भूमिका कामगार संघटनांनी घेतल्याने हजारो प्रवासी अडकून पडले, विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांचे यामुळे आतोनात हाल झाले. नानासाहेब तुकाराम जगताप असे मारहाण झालेल्या बसचालकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते एमएच १२ ईएस ६६३५ क्रमांकाची एसटी पनवेल येथून अलिबागला घेऊन येत होते. मुंबई-गोवा महामार्गावर गाडी जिते गावाजवळ आली असता, एच ६ डीएल ७०९ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून तीन तरुणांनी गाडी आडवी घालून एसटी थांबवली. त्यानंतर आणखी चार जण तिथे दाखल झाले आणि एसटीचालकाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण करण्यात आली.
पनवेल डेपोमध्ये एका प्रवाशाशी झालेल्या वादातून ही मारहाण करण्यात आली. प्रवाशाने आपल्या साथीदारांना फोनवर बोलावून ही मारहाण केली गेली. येथील बसचालक नानासाहेब जगताप काही काळ बेशुद्धही पडले. मारहाणीनंतर जगताप यांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटना घडून १४ तास उलटले तरी पोलिसांनी कोणतीच हालचाल केली नाही. अखेर संतापलेल्या एसटी कामगारांनी अलिबाग आगारातून होणारी एसटी वाहतूक रोखून धरली. चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना जोवर अटक होणार नाही, तोवर आगारातून एकही एस. टी. बाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
त्यामुळे मुंबई-पुण्यासह कोकणात जाणारे हजारो प्रवासी अडकून पडले. कामगारांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले आणि दहावी, बारावीच्या मुलांना बसला. एसटी सेवा कोलमडल्याने अनेक विद्यार्थी अडकून पडले. बससेवा सुरळीत करा, अशी विनंती त्यांनी केली. मात्र एस.टी. चालक आणि वाहक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान एस.टी. चालकांना जिते गावाजवळ मारहाण होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन आगारातील कर्मचाऱ्यांना याच परिसरात मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात गुन्हेही दाखल आहेत. मात्र तरीही चालक आणि वाहकांना मारहाण करण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे दोषींवर कारवाई झाल्याशिवाय एस. टी. सेवा पूर्ववत सुरू करणार नसल्याचे कामगार संघटनांनी जाहीर केले. अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार यांची भेट घेऊन त्यांनी निवेदनही दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा