लोकसत्ता टीम
राजापूर : सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्या एस टी बसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने ५० प्रवाशांचा जीव वाचला. मात्र ही गाडी दरीत कोसळून होणारी मोठी जीवितहानी टळली.
आणखी वाचा- दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
राजापूर सांगली बस घेवून चालक एस.आर. कुर्णे हे आपल्या ताब्यातील बस (क्र. एम. एच. १४ बी. टी. २९७५) घेऊन सांगली येथुन सकाळी साडे सहा वाजता निघाले. ही बस सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान अणस्कुरा घाट उतरत असताना अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. चालक कुर्णे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी बस डोंगराच्या दिशेने वळवत थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. या बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. या सर्व प्रवाश्यांचे प्राण चालक कुर्णे यांच्या प्रयत्नाने वाचले. चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.