एसटी महामंडळाने महिला कंडक्टर मंगल गिरी यांचं निलंबन अखेर मागे घेतलं आहे. कर्तव्यावर असताना ‘इन्स्टाग्राम’वर रील बनवत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर अनेकांनी या कारवाईविरोधात आवाज उठवला होता. तसंच निलंबन मागे घेण्याचीही मागणी केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांचा समावेश होता. या मागणीची दखल घेत त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली आहे.
गणवेश घालून रील्स बनवणं लेडी कंडक्टरच्या अंगाशी आलं; झाली निलंबनची कारवाई
कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या मंगल गिरी यांच्यावर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उचलला होता. इतकंच नाही तर त्यांचे व्हिडीओ शूट करणाऱ्या वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार यांनाही निलंबित कऱण्यात आलं होतं. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप मंगलवर करण्यात आला होता.
रोहित पवारांचं ट्वीट
मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट केलं होतं. “अनेक ताणतणाव असूनही दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देणारे एसटीचे कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी इन्स्टा स्टार होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं,” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं होतं.
निलंबन रद्द केल्याच्या निर्णयाचं स्वागत
“माझ्यासह इतर अनेकांनी केलेल्या मागणीची दखल घेत अखेर इन्स्टा स्टार मंगल गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन रद्द करण्यात आलं. याबद्दल सरकारचे आभार! भविष्यात गिरीताई याही एसटीच्या गणवेशाचा, आणि एसटीचा सन्मान राखतील अशी अपेक्षा,” असल्याचंही रोहित पवार म्हणाले आहेत.
मंगल यांचे इन्स्टाग्रामवर एक लाख फॉलोअर्स आहेत. त्या नेहमी सोशल मीडियावर रील्स शेयर करत असतात. त्यांचे अनेक रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होतात. त्यांनी नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओही व्हायरल झाला होता. याच व्हिडीओवर एसटी महामंडळाने आक्षेप घेतला होता.