सांगली : गुरुवारची दिवे लागण झालेली. तालुक्यातील काम आवरुन प्रवासी १५ किलोमीटरवरील घाटनांद्रे बसने गावी परतत होते. कुची, जाखापूर गावे मागे पडली. आता कुंडलापूर येणार होते. तर बसला गती देणारा ॲक्सिलेटर निसटला. अशाही स्थितीत त्याला दोरीने बांधून महिला वाहकाच्या हाती देत चालकांने सारथ्यचक्र सावरत अंतिम थांबा गाठून प्रवाशांना घरपोच केले. याच जुगाडाने परतीचा प्रवास करीत आगारापर्यंत लालपरी सुखरुप पोहचवली.
महिला प्रवाशांना अर्ध्या खर्चात प्रवास करण्याची सवलत लागू झाली. लालपरीकडे प्रवाशांची गर्दीही वाढली. पण नादुरुस्त बसची संख्या मात्र वाढतीच आहे. अशा बसमधून सुरक्षित प्रवास कसा होणार ? बहुजन हिताय, बहुजन सुखाय या महामंडळाच्या ब्रीद वाक्याचे काय असा प्रश्न नादुरुस्त, गळक्या बसमधील प्रवाशांना न पडता तरच नवल. बस वेळेवर धावत नाहीत. आणि लागल्याच तर त्याला चालक, वाहक वेळेवर मिळत नाहीत. यामुळे वेळापत्रक नेहमीच विस्कळीत झालेले असते.
कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमध्येही गुरुवारी असाच अनोखा अनुभव प्रवाशांना आला. ॲक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून निष्णात वाहक एम ए. पाटील यांनी जुगाड केला. स्वत: च्या हाती सारथ्यचक्र (स्टेअरिंग) घेतले आणि ॲक्सिलेटरला दोरी बांधून महिला वाहक पी. व्ही. देसाई यांच्या हाती गती नियंत्रन दिले. वेग कमी जास्त महिला वाहक करीत होत्या, तर चालक सारथ्य करीत होते. या अवस्थेत गर्जेवाडी, तिस़गी हे थांबे करीत घाटनांद्रेपर्यंतचा प्रवास करुन प्रवाशांना इच्छित थांब्यापर्यंत सुखरुप सोडले.
प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून वाहक व चालकाने केलेली कसरत प्रवाशांच्या कौतुकाचा विषय ठरली. बसमधून उतरताना सर्वांनी दोघांनाही धन्यवाद दिले. प्रवाशांना सोडून याच जुगाडाने परतीचा प्रवास करीत तालुक्याचे आगारही गाठले.