ठाणे-नगर एस.टी.बस माळशेज घाटात खोल दरीत कोसळल्यामुळे २७ प्रवासी ठार, तर ११ जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घाटातील हा सर्वात मोठा अपघात आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २६ पकी २० जणांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे, तर सहा जणांचा मृतदेह जुन्नर येथे ठेवण्यात आलेला आहे.
फोटो गॅलरी: माळशेज घाटात अपघातवार
मुरबाड व ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, ठाणे आगाराची विठ्ठलवाडी-नगर ही बस सकाळी ७.३० वाजता नगर दिशेने निघाली होती. कल्याण-नगर रोडने माळशेज घाटातील बोगद्याच्या १ कि.मी. अंतरावर आली, तेव्हा तिथे कल्याणकडे जाणारा लाकडाने भरलेला ट्रक उभा होता. त्याला एस.टी. बसची जोरात धडक बसली. त्यानंतर ती दरीत कोसळली. ही बस घाटातील दरीत सुमारे २५० ते ३०० फुटांपर्यंत गेली. हा अपघात इतका भयानक झाला की, एस.टी.बस चे दोन तुकडे झाले आणि संपूर्ण छत निघून गेले. एस.टी.बसमधील प्रवाशी ठिकठिकाणी विखरले गेले होते. त्यांचे मृतदेह छिन्न विछिन्न होऊन पडले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने माळशेज येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी हॉटेल मधील ग्राहक यांनी घटनास्थळी धावले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना अपघाताची भीषणता समजली. या अपघाताची माहिती हॉटेल चालक शंकर कुमकर यांनी नारायणगाव, जुन्नर, ओतूर, टोकावडे, सावरणे, मुरबाड येथील पोलीस ठाण्यांना दिली.
एस.टी.आगाराने स्थानिक बसस्थानकांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती संपूर्ण जुन्नर, मुरबाड तालुक्यात पसरताच मदत कार्यासाठी अनेक संघटनांनी पुढाकार घेतला. विघ्नहर कारखाना, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना या पक्षांच्या तसेच तालुक्यातील विविध डॉक्टरांनी आपल्या स्वतच्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून दिल्या. पोलीस पथकेही तिथे दाखल पोहोचली आणि त्यांनी अपघातातील जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील शिव सह्य़ाद्री अश्वमेघ युवा मंच, संभाजी तांबे प्रतिष्ठाण, सहयाद्री गिरी भ्रमण संस्था जुन्नर, मृत्युंजय फाऊंडेशन नारायणगाव, रोटरी क्लब, व्यापारी असोशिएशन आळेफाटा, जुन्नर, ओतूर, यांनी जखमी व मृतदेहांना बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हिणजे मढ येथील पेढे विकणाऱ्या दहा ते पंधरा मुलांनी परिसरातून चादरी गोळा करून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्याचे कार्य केले.
माळशेज घाटात कामानिमित्त असलेल्या गणेश बुट्टे पाटील यांचा जे.सी.बी. जखमी तसेच मृतदेह काढण्यास यशस्वी ठरला. या जे.सी.बी.या बकेटमधून दरीतील जखमींना व मृतदेहांना बाहेर काढण्यास मोठा हातभार लागला. त्यामुळे जखमींना लवकरात लवकर उपचार मिळाले. घटनास्थळी तातडीने जुन्नर व मुरबाड तालुक्यातील आरोग्य अधिकारी तत्परतेने हजर झाले. अनेक समाजसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी रस्सीस रस्सी बांधून साखळी करून खोल दरीत उतरले. तेथील सर्व जखमींना व मृतदेहांना बाहेर काढण्यात खूप मोठी मदत केली.
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजातच आळेफाटा येथील अॅम्ब्युलन्स चालकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. या माळशेज घाटाच्या सुरळीत वाहतुकीचा भेडसावणारा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने घेतला नसल्याने हा मोठा अपघात झाला, असा आरोप आमदार वल्लभ बेनके यांनी केला.
ओतूर येथे ठेवलेले मृतदेह
बसचालक किसन नानाभाऊ चौधरी (रा.वडझिरे ता.पारनेर), विजय कोंडीराम कुलकर्णी (रा.अहमदनगर), परशुराम शंकर सुरवणे (रा.बोरी शिरोली), मेघा निवृत्ती हांडे (रा.हिवरे बुद्रुक, ता.जुन्नर), तुकाराम दगडू भवारी (रा.जवळे बाबळेश्वर, नगर), पोपट नाथा दाते (रा.आळकुटी), कारभारी शांताराम कुरकुटे (रा. कुरकुटवाडी बोटा), जुन्नर तालुक्यातील आणे येथील एकाच कुटुंबातील- बाळू तुळशीराम आहेर, सरस्वती बाळू आहेर, बबन तुळशिराम आहेर, पूनम बबन आहेर, प्रशांत वसंत आहेर. याठिकाणी असलेल्या अन्य नऊ मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
जुन्नर येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आलेल्या ६ मृतदेहांपकी तीन जणांची ओळख पटली आहे. त्यांची नावे- प्रशांत वसंत आहेर (रा.आणे, ता.जुन्नर), वाहक देवराम भिमा गोंडके (रा.करंडी ता.अकोले,) कल्याण किसनराव जाधव (रा.ठाणे)
या बसमध्ये एकूण ४२ प्रवाशी असावेत, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. २७ मृत्युमुखी पडलेले व ११ जखमी अशा ३७ जणांना उलगडा झाल्याने अन्य पाच जण आहेत किंवा नाहीत याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
आळेफाटा येथे एकूण ११ जखमींना आणण्यात आले असून त्यापकी तीन जखमींना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. इतरांना नारायणगावजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे अशी- नितीन मिच्छद्र देशमुख (वय २५ रा. हिवरे बुद्रुक, ता.जुन्नर) डॉ. कास हलवाई (वय ३०, रा.ठाणे), लीलाबाई वसंत आहेर (वय ४५), राधा बबन आहेर (वय ४५), आकाश बाळु आहेर (वय ३०, तिघेही रा.आणे ता.जुन्नर), ममता अजवीर मौर्य (वय २१ रा.ठाणे), गायत्री श्रीकृष्ण पालेकर (वय २४, रा.ठाणे), अंजना निवृत्ती हांडे (रा.नारायणगाव ता.जुन्नर), खुशबु हलवाई (वय ४०, रा.ठाणे), माया जाधव (वय ४५), सीता जाधव (वय ४०, दोघी रा. बीड).
माळशेज घाटात एसटी कोसळून २७ मृत्युमुखी
ठाणे-नगर एस.टी.बस माळशेज घाटात खोल दरीत कोसळल्यामुळे २७ प्रवासी ठार, तर ११ जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घाटातील हा सर्वात मोठा अपघात आहे.
आणखी वाचा
First published on: 02-01-2014 at 11:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus falls in malshej valley