रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन आगरातील बागमांडले येथून सकाळी सव्वा दहाला सुटणाऱ्या बसला साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर साखरोने फाट्याजवळ ही बस रस्त्यावर उलटली आहे.
हा अपघात घडल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महामंडळाच्या बसमधून (एम एच १४ बीटी २७३८) ३० प्रवाशी प्रवास करत होते. यातील १६ प्रवाशी जखमी झाले आहेत.
सर्व जखमी प्रवाशांना श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चार जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त प्रवाशांना मदत केली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.