अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या एस.टी. कष्टकरी जनसंघटनेच्या पावत्या जाळून निषेध व्यक्त केला. एकेकाळी सर्व एसटी कर्मचारी गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तोच एसटी कर्मचारी आता गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गेला आहे. कारण आंदोलनावेळी दिलेलं एकही आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालं नाही, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला.
याच्याच निषेधार्त नाराज एसटी कर्मचाऱ्यांनी अकोल्यात आगार क्रमांक दोनच्या गेटसमोर सदावर्ते यांच्या संघटनेच्या पावत्या जाळून निषेध केला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी ‘सदावर्ते मुर्दाबाद…मुर्दाबाद…’ अशा घोषणा दिल्या.
हेही वाचा- “कुठलाही उठाव एका रात्रीत किंवा दिवसात….” शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य
दरम्यान, उद्धव ठाकरे कामगार सेनेचे विभागीय सचिव देविदास बोदडे यांनी प्रतिक्रिया दिली. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात रोष व्यक्त करताना बोदडे म्हणाले, “सदावर्तेंवर आम्ही विश्वास ठेवला होता. पण त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या संघटनेच्या पावत्या जाळून निषेध व्यक्त करत आहोत. आम्ही आता सदावर्ते यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यांच्यामुळे आमचं फार नुकसान झालं आहे. आमचा पाच महिन्यांपासून पगार झाला नाही. आमच्यापैकी काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.”
हेही वाचा- “सुषमा अंधारे म्हणजे राजकारणातला फिरता…”, ‘स्टूलवाली बाई’ म्हणत मनसे नेत्याची टीका
“त्याचबरोबर सदावर्ते यांच्या संपात काही लोकांचा जीवही गेला आहे. यावर सदावर्ते शब्दही बोलायला तयार नाहीत. ते फक्त राजकारण करत आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि टिपू सुलतान अशा मोठ्या नेत्यांची नावं घेऊन ते एसटी कर्मचाऱ्यांना भरकटवत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो,” अशी टीका बोदडे यांनी केली.