अवैध वाहतुकीला शह देण्यासाठी एसटी महामंडळाने १० वर्षांपूर्वी राज्याच्या शहरी तसेच काही ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी मिडी बस गाड्या आणल्या. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा तर बसलाच नाही, मात्र मिडी बसच हद्दपार होऊ लागल्या. आयुर्मान संपत आल्याने व प्रतिसादही मिळत नसल्याने एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातून ५९६ मिडी बस टप्प्याटप्यात काढण्यास सुरुवात केली. आता १५० बस ताफ्यात असून यातील ११० बस भंगारात काढल्या जाणार आहेत. उर्वरित बस काही महिन्यांकरीता प्रवाशांच्या सेवेसाठी असतील. त्याही बस ताफ्यातून लवकरच काढण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामीण भागात जाताना एसटीला होणारी अडचण, मोठी एसटी भरण्यास लागणारा वेळ आणि तेच हेरुन दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशाला होणारा मनस्ताप पाहता, अवैध प्रवासी वाहतुकदार आपल्याजवळील छोटी जीप, टमटम व अन्य वाहनातून त्यांची वाहतुक करण्यासाठी पुढे येऊ लागले. एसटी महामंडळाकडून अवैध प्रवासी वाहतुकदारांवर पोलिसांमार्फत कारवाईही करुन झाली. परंतु परिस्थिती जैसे थे राहिली. अखेर महामंडळाने २०१० पासून मुंबई महानगराबाहेरील शहर, ग्रामिण भागांत २४ आसनी मिडी बस चालवण्याचा निर्णय घेतला.

वर्ष २०१० ते २०१२ या दरम्यान मिडी बसची संख्या वाढवून ५९६ करण्यात आली. नाशिक, औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी, मिरज, माथेरानसह राज्यातील अनेक भागात या बस धावू लागल्या. कमी अंतरावर बस चालवताना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांवरुन धावताना बसमध्ये होणारे तांत्रिक बिघाड, मध्येच बस बंद होणे, मिडी बसची तिकीटाची अधिकची रक्कम पाहता त्याचाच फायदा अवैध प्रवासी वाहतुकदारांकडून घेण्यास सुरुवात झाली. या वाहतुकदारांनी तर एसटीच्या मिडी बसच्या तिकीटांपेक्षाही कमी तिकीट ठेवले आहे. त्यामुळे १०० टक्के प्रवासी आसनक्षमता आणि २५ टक्के उभ्याने प्रवासी क्षमता असतानाही मिडी बस हळूहळू कमी प्रवासी क्षमतेने धावू लागल्या.

या बसचे विविध भागही मिळत नसल्याने परिणामी त्याच्या देखभालीसाठी येणारा खर्च जास्त व उत्पन्न कमी होऊ लागला. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या व आयुर्मान न संपलेल्याही मिडी बस टप्प्याटप्यात भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या एकूण ५९६ पैकी १५० बस आहेत. परंतु त्यातील साधारण ११० बस भंगारात काढणार असून फक्त ४० बसच ताफ्यात ठेवणार आहेत. उर्वरित बसचेही आयुर्मान कमी असून ते संपताच मिडी बस सेवा बंदच होईल, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

मिडी बसचा खर्च परवडणारा नाही –

मिडी बसचा खर्च परवडणारा नाही. या गाड्यांचे विविध भागही मिळत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षात आयुर्मान संपलेल्या आणि आयुर्मान न संपलेल्याही बस टप्प्याटप्यात भंगारात काढण्यात येत आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिल आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St midi bus to be deported failure to prevent illegal passenger traffic msr