कुंभमेळा, गणेशोत्सवासाठी पाच हजार बसगाडय़ा; उर्वरित राज्यात गैरसोय
कुंभमेळा आणि गणेशोत्सव या दोन उत्सवांमुळे सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय झाली आहे. कुंभमेळ्यासाठी एसटी महामंडळाने तीन हजार बसगाडय़ा, तर गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी दोन हजार गाडय़ा, अशी तरतूद केली आहे. मात्र त्यामुळे अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे या विभागांतील वाहतुकीसाठी गाडय़ांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी या विभागांतील प्रवाशांना सेवा देण्यासाठी कमी गाडय़ा उपलब्ध असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
यंदा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात २८-२९ ऑगस्ट रोजीच्या पर्वणीला एसटी महामंडळाने तीन हजार विशेष गाडय़ांची तरतूद केली होती. या वेळी एक कोटी भाविकांना सेवा द्यावी लागेल, असा अंदाज स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला होता.
या जादा गाडय़ांसाठी एसटी महामंडळाने अकोला, अमरावती, नागपूर, पुणे आदी विभागांतून गाडय़ा मागवण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या पर्वणीसाठी पाच ते सात लाख भाविकच हजर राहिल्याने यापैकी अनेक गाडय़ांचा उपयोग झाला नाही. त्यामुळे या गाडय़ा पुन्हा त्या त्या विभागांत पाठवण्यात आल्या.
आता १३ सप्टेंबर रोजी असलेल्या पर्वणीच्या वेळी या गाडय़ा पुन्हा नाशिक विभागात बोलवल्या जाणार आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तुटवडा दरवर्षीच
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या या गाडय़ांपैकी औरंगाबाद, पुणे आणि नाशिक विभागाच्या एकूण एक हजार ७०० गाडय़ा मुंबईत गणेशोत्सवाआधी येणार आहेत. या गाडय़ा गणेशोत्सव विशेष गाडय़ा म्हणून कोकणाकडे जातील. यात प्रत्येक विभागाच्या ४०० ते ४५० गाडय़ांचा समावेश आहे. या गाडय़ा त्या त्या विभागांतून आल्याने प्रत्येक विभागात गाडय़ांची कमतरता भेडसावते. यंदा कुंभमेळ्यामुळे जास्त ताण पडला आहे. मात्र ही दरवर्षीची पद्धत असून दरवर्षीच गणेशोत्सवादरम्यान थोडय़ाफार फरकाने प्रत्येक विभागात गाडय़ांचा तुडवडा जाणवतो. परिणामी राज्यभरातील प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत असल्याची कबुलीही या अधिकाऱ्याने दिली.