ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना एसटीतून प्रवास करताना शासनामार्फत सवलत मिळते. त्यामुळे गोरगरिबांची मुले शिकू लागली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात एसटीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन आमदार पंडित पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त अलिबाग एसटी आगारात आयोजित कार्यक्रमात पंडित पाटील बोलत होते. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग पंचायत समितीचे उपसभापती अनिल पाटील, रायगडचे विभागीय नियंत्रक अजितकुमार मोहिते, विभागीय वाहतूक अधिकारी संजय सुर्वे, आगार व्यवस्थापक एस.यू वाघ, श्रीकांत सतावडेकर, रमेश लाखे, प्रसन्न पाटील, डॉ.संदेश म्हात्रे तसेच कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एसटी कामगारांच्या समस्या भरपूर आहेत. त्यांना कमी वेतनात अधिक तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणावरून हल्लेही मोठय़ा प्रमाणात होत आहेत. त्यांना वेळेवर मेडिकल बिल मंजूर होत नाही. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित खात्याकडे मागणी करून कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. अलिबाग आगार हे जिल्ह्य़ाचे ठिकाण आहे. या आगारात नवीन एसटी बसेस देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे याबाबत मागणी केली जाईल असे आश्वासन यावेळी पंडित पाटील यांनी दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गेली ३६ वर्षे विनाअपघात सेवा करणारे चालक भगवान नाईक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Story img Loader