सातारा : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात एसटी महामंडळ सतर्क झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. वर्षभरात सुमारे सहा भरारी पथकांमार्फत बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या एसटीने विविध सवलत योजना आणल्या आहेत. शासनाने ७५ वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत एसटी प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना ५० टक्के तिकिटामध्ये सवलत देणारी महिला सन्मान योजना सुरू केली. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. महिला सन्मान योजनेमुळे महिलांसोबत पुरुषांची प्रवासी संख्या वाढली आहे. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन हे ब्रीदवाक्य जरी प्रचलीत असले तरी हे ब्रीदवाक्य प्रवास करताना पाळले जाते. मात्र, प्रवास करताना तिकीट न काढणारे प्रवासी देखील काही कमी नाहीत.
फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी महामंडळाच्या सातारा विभागाने सहा भरारी पथकांमार्फत वर्षभरात विविध मार्गावर एसटी बसेसची तपासणी करण्यात आली. फुकटचा प्रवास करणाऱ्या १६९ प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणीमार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी मोठी रक्कम असेल ती रक्कम प्रवाशांना भरावी लागते. त्यामुळे दंडाची दुप्पट रक्कम भरण्यापेक्षा तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.