गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे. बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
“सरकारने सांगितलं आहे की राज्य सरकार निधी महामंडळाला वर्ग करेल. महिन्याला १० तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे. पण सरकार दोन पावलं पुढे आलं आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू”, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. “आझाद मैदान येथे सुरू केलेलं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे. त्यात आम्ही कर्मचाऱ्यांसोबत असू”, असं देखील सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
“कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं. आम्ही आझाद मैदानात त्यांना घेऊन आलो होतो. आम्ही तात्पुरतं आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेतलं आहे. कामगारांनी हे आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे त्यांनी याबाबतचा पुढचा निर्णय घ्यायचा आहे. कामगारांना न्याय मिळावा हा आमचा हेतू होता. भविष्यात वेतनवाढीसाठी आपण आंदोलन करू शकतो. आंदोलकांनी पुढे आंदोलन सुरू ठेवलं, तर त्याला आमचा पाठिंबा असेल.”, असं यावेळी सदाभाऊ खोत यांनी नमूद केलं.
“हा राज्याच्या इतिहासातला कामगारांनी स्वत: उभ्या केलेल्या संपातला एक मोठा विजय आहे. खऱ्या अर्थाने हा निर्णय कामगारांचं मोठं यश आहे. पहिल्या टप्प्यातला हा विजय आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच ठेवायची आहे. कामगारांच्या संपाला राज्यातल्या जनतेची मोठ्या प्रमाणात सहानुभूती लाभली होती. शासकीय कर्मचारी आणि एसटी कामगार यांच्यातली तफावत सरकारला दूर करावी लागेल. आम्ही दोघे आमदार एसटी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात त्यांची बाजू मांडत राहणार आहोत”, असं सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं.
गोपीचंद पडळकरांनीही दिला खोतांना दुजोरा
“संपाचं नेतृत्व ना गोपीचंद पडळकर करतायत, ना सदाभाऊ खोत करतायत. आम्ही भाजपाचे आमदार म्हणून संपात सहभागी झालेलो नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलनाला आम्ही आझाद मैदानावर सुरुवात केली. कर्मचाऱ्यांना तिथे यायचं आवाहन केलं. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी तिथे दाखल झाले. पण विलिनीकरणाचा निर्णय येईपर्यंत संप तसाच सुरू ठेवणं शक्य नाही”, असं गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं.