शुक्रवारी दुपारनंतर राज्यभरात चर्चा होती ती एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाची. यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्याचं दृश्यांमध्ये दिसत होतं. यानंतर रात्रीपर्यंत यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. मात्र, मध्यरात्री देखील हा हायव्होल्टेज ड्रामा सुरूच राहिला. आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांवरच जीविताला धोका असल्याचा आरोप केला. यानंतर आझाद मैदानावरून पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर जमावानं थेट सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी जमावाला भडकावल्याप्रकरणी आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखाल करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंदोलकांना शांतता राखून सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. न्यायालयाने देखील २२ तारखेपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
मध्यरात्री उशीरा आंदोलकांना हटवलं
सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर सर्व एसटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानावर पोहोचले होते. रात्रीपर्यंत आंदोलक तिथेच थांबल्यानंतर या आंदोलकांना मध्यरात्री उशीरा आझाद मैदानातून देखील हटवण्यात आलं. या कारवाईनंतर हे सर्व आंदोलक जवळच्याच सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडून बसले आहेत. आपल्याला पोलिसांनी बळजबरीने आझाद मैदानातून हुसकावल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत सिल्व्हर ओकवरील आंदोलनप्रकरणी १०५ आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ‘दूध का दूध, पानी का पानी करू’ असं बजावून सांगितलं आहे.