जळगाव येथील यावलमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले यावल डेपोतील ४८ वर्षीय चालकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून शिवाजीनगर परिसरातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

शिवाजी पंडीत पाटील असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव असून ते बारीपाडा येथे रहायला होते. माझी मन:स्थिती खराब झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी मृत्यपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांना मार्च अखेरपर्यंत कामावर रुजू होण्याचे अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार तणावातून शिवाजी पाटील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप एसटी कर्मचार्‍यांनी करत सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला आहे.

शिवाजी पाटील हे यावल येथे पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्यास होते. गेल्या आठ वर्षांपासून ते यावल आगारात चालक म्हणून नोकरीला होते. गेल्या पाच माहिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात शिवाजी पाटील हे देखील सहभागी होते. सोमवारी या संपाला साडेपाच महिने झाले असून अद्याप कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नसल्याने संप सुरूच आहे. त्यामुळे पगार देखील बंद झाला आहे. या संकटात शिवाजी पाटील देखील सापडले. त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन किंवा दुसरा जोडधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बहिणीने भावाला धान्य व कपडेही पुरवले.

शिवाजी पाटील हे गुरूवारी २४ मार्च रोजी शहरातील जुने जळगावातील बहिण लता आणि मेहूणे देवराम बारी यांच्याकडे आले होते. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे बहिणीला बोलून दाखविले. त्यामुळे बहिणीने परिस्थिती लक्षात घेवून भावाला तांदूळ, मुलांसाठी कपडे आणि काही पैसे दिले. हे सामान घेवून ते रविवारी २७ मार्च रोजी यावल येथे घरी गेले. त्यानंतर काल सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी घरुन आगारात जातो असे सांगून गेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील यांनी खिश्यात आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ रेल्वेरूळावर धावत्‍या रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये, “माझी मन:स्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येचा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नाही, धन्यवाद” असे म्हटले आहे. मयत शिवाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी हिरकणीबाई, मुलगा हेमंत व मुलगी उत्तेषा तसेच आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने शिवाजी यांच्या पत्नीलाही मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जळगावातील मेहुणे देवराम बारी, पत्नी हिरकणी व दोन मुले यांनी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी मयत शिवाजी पाटील यांची पत्नीने रुग्णालयामध्ये प्रचंड आक्रोश केला होता. घटनेने मानसिक धक्का बसल्याने त्या बेशुद्ध पडल्या त्यांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीही जिल्हा रुग्णालयात जाऊन मयत शिवाजी पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

एसटी कर्मचार्‍यांचीही मोठी गर्दी रुग्णालयात झाली होती. कारवाईची टांगती तलवार, दोन वर्षांपासून करोनाच्या महामारीमुळे एसटी कर्मचार्‍यांचे कंबरडे मोडले होते. त्यात आता संप सुरु असल्याने एसटी कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. यातच शासनाकडून कारवाईची टांगती तलवार असल्याने या तणावातून कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे संपातील कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.

Story img Loader