मराठवाडय़ातल्या जालना, बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद या चार जिल्हय़ांमधील दुष्काळाच्या स्थितीची चर्चा राज्यभर झाली. तीव्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर नेत्यांचे ‘दुष्काळी पर्यटन’ही सुरू आहे. पाण्याची तीव्रता दिवसागणिक वाढतेच आहे. मात्र, या दुष्काळी जिल्हय़ांतील दुधाचे प्रमाण फारसे घटलेले नाही. औरंगाबाद व जालना जिल्हय़ांत जानेवारीपर्यंत दूधसंकलनात वाढ होती, तर उस्मानाबादमध्ये ७ हजार ४०० लीटर घट दिसून आली. ज्या तुलनेने चारा छावण्यांवर खर्च होत आहे, त्या तुलनेने दुधाचे प्रमाण स्थिर कसे, असा प्रश्न मुख्य सचिवांनीदेखील विचारला आहे. या अनुषंगाने मराठवाडय़ातील अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. शेतकरी जनावरांवर ‘लेकरा’सारखे प्रेम करतो, असे सांगून दुधाच्या आकडेवारीचे समर्थन केले जाते.
मराठवाडय़ातील आठही जिल्हय़ांत तसेही दूध कमी आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दुधाचा व्यवसाय बहरला नाही. राज्याच्या एकूण दूधसंकलनात मराठवाडय़ाचा हिस्सा तसा नगण्य म्हणता येईल, अशीच आकडेवारी आहे. शेतीसाठी बैलाचा व दूधदुभत्यासाठी गाई-म्हशी सांभाळून जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या उन्हाळय़ात वेगळेच प्रश्न निर्माण झाले. काहींनी चारा नसल्यामुळे जनावरे विकली. तथापि, दूधसंकलनाची राज्याची आकडेवारी वेगळेच चित्र उभे करते.
मराठवाडय़ात सर्वाधिक तीव्र दुष्काळ असणाऱ्या जालना जिल्हय़ात डिसेंबरमध्ये १५ हजार ६०० लीटर दुधाचे संकलन होते. ते जानेवारीत १७ हजार ५०० लीटर झाले. म्हणजे एका महिन्यात १ हजार ९०० लीटर वाढ दिसून आली. जालना जिल्हय़ात सध्या २३ चारा छावण्या मंजूर असून २० छावण्या सुरू आहेत. या छावण्यांमध्ये ५ हजार ७०५ मोठी जनावरे, तर १ हजार १६१ लहान जनावरे आहेत. या जनावरांच्या चाऱ्यापोटी आतापर्यंत ८५ लाख ८६ हजार रुपये खर्च झाले आहेत. अशीच स्थिती औरंगाबादची आहे. औरंगाबाद जिल्हय़ात डिसेंबर महिन्यात ९६ हजार ५०० लीटर दूध संकलित झाले. जानेवारीत त्यात वाढ झाली. ९९ हजार २०० लीटर दूध एकत्रित करण्यात आल्याची माहिती दुग्धविकास अधिकाऱ्यांकडे आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील दुधात २ हजार ७०० लीटरची वाढ दिसून आली. औरंगाबाद जिल्हय़ात फेब्रुवारीमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. त्यावर २९ लाख ४७ हजार खर्च झाला आहे. बीडमध्ये मात्र दुधाच्या संकलनात काही अंशी घट दिसून येते. मात्र, ज्या तुलनेत चारा छावण्या आहेत व चाऱ्यावर खर्च झाला, त्या तुलनेत दुधाचे संकलन काही अंशी का असेना स्थिर ठेवण्यात यश आल्याचे चित्र कागदावर रंगवता येते. बीड जिल्हय़ात डिसेंबरमध्ये २ लाख ८ हजार लीटर दूध संकलित करण्यात आले. जानेवारीमध्ये त्यात २ हजार ३०० लीटरची घट झाली. बीड जिल्हय़ात २९ चारा छावण्या आहेत आणि त्यावर १८ कोटी ५७ लाख २२ हजार एवढी रक्कम खर्च झाली. नांदेड व हिंगोली या दोन जिल्हय़ांतही दुधाची आकडेवारी वाढलेलीच आहे. दुष्काळातही दुधाचे संकलन स्थिर कसे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अधिकाऱ्यांना केला होता. मराठवाडय़ातील अधिकाऱ्यांना याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही, असे सूत्रांनी सांगितले. या आकडेवारीवरून चारा छावण्या आदर्श आहेत किंवा दूधसंकलनाचे आकडे चुकीचे आहेत, असे निष्कर्ष काढता येऊ शकतात. या अनुषंगाने विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता दुधाचे दर व तापमान यामुळे बराच फरक पडू शकतो. तुलनेने तो दिसत नसला तरी मार्च-एप्रिलमध्ये तो जाणवेल, असे अधिकारी सांगतात.