सिंधुदुर्ग जिल्हा मुद्रांक व बाजारमूल्य दर ठरविणाऱ्या बैठकीस पालकमंत्री, खासदार आमदारांनी गैरहजेरी लावली. मात्र सन २०१२ चे मुद्रांक व बाजारमूल्य दरवाढ चार ते पाच पटीने करण्यात आल्याने ते अन्यायकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. जिल्हाधिकारी विक्रम सिंह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, वेंगुर्ले उपनगराध्यक्ष रमण वायगणकर उपस्थित होते. पालकमंत्री खासदार व आमदारांनी अनुपस्थिती दर्शविली.
या बैठकीत बिल्डर्सना निमंत्रित करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मुंबई, पुणे, पनवेल, कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्य़ांपेक्षा कमी प्रगतशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामध्ये जमीन, निवासी फ्लॅटस्, गाळा यांचे बाजारमूल्य व मुद्रांक शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सन २०१२ करिताचे बाजारमूल्य व मुद्रांक शुल्क दर सन २०११ च्या तुलनेत दोन ते पाच पटीपर्यंत अधिक असल्याने यापुढे सन २०११च्या तुलनेने सन २०१३चे बाजारमूल्य व मुद्रांक निश्चित करण्याची सूचना नगराध्यक्ष बबन सांळगावकर यांनी केली.
मुद्रांक शुल्क दरवाढ ठरविण्यापूर्वी बैठक घेणे आवश्यक असताना सन २०१२ चे मुद्रांक शुल्क ठरविताना सर्व संबंधितांची बैठक घेण्यात आली नसल्याने सन २०११ प्रमाणेच मुद्राक शुल्काची अंमलबजावणीची मागणी करण्यात आली.
जिल्ह्य़ातील संभाव्य बिनशेती जमिनीची निश्चिती करताना बिनशेती होणार नाहीत अशा क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. मुद्रांक शुल्क व बाजार मूल्य अनाठायी वाढविण्यात आल्याने शहरात निवासी फ्लॅटस्, गाळे, बिनशेती भूखंड खरेदीवर परिणाम झाला आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. मुद्रांक शुल्क व बाजारमूल्य ठरविताना सन २०११ चा विचार व्हावा असे सुचविण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा