Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. या गाण्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर विधानसभेच्या सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत कारवाईचे संकेत दिले होते. यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हा देखील दाखल झाला.
शिवेसनेच्या (शिंदे) नेत्यांकडून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला दोनवेळा चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र, अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झाला नाही. यामुळे मुंबई पोलिसांचं एक पथक आज (३१ मार्च) कुणाल कामराच्या मुंबईतील घरी पोहोचलं होतं. या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने एक सूचक ट्वीट केलं. तसेच आपण १० वर्षांपासून राहत नसलेल्या ठिकाणी जाणं म्हणजे सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय असल्याचं म्हटलं आहे.
कुणाल कामराने ट्विटमध्ये काय म्हटलं?
कुणाल कामराला पोलिसांनी समन्स बजावलं होतं. मात्र, समन्स देऊनही कुणाल कामरा चौकशीसाठी हजर न झाल्यामुळे आज मुंबई पोलिसांचं एक पथक कुणाल कामराच्या मुंबईतील घरी पोहोचलं होतं. मुंबई पोलिसांचं पथक घरी दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने एक सूचक ट्वीट केलं. “गेल्या १० वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे”, असं कुणाल कामराने म्हटलं आहे.
Going to an address where I haven’t lived for the last 10 Years is a waste of your time & public resources… pic.twitter.com/GtZ6wbcwZn
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 31, 2025
राहुल कनाल यांचा कामराला सूचक इशारा
शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामराला सूचक इशारा दिला आहे. राहुल कनाल यांनी म्हटलं की, “कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. तसेच न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे.न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, तो दिलासा ७ एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं. कुणाल कामराला तामिळनाडूमध्ये कितीही संरक्षण असलं तरी जेव्हा मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू, ही धमकी नाही, तर आपल्याकडे अथिती देवो भवची संस्कृती आहे”, असं म्हणत राहुल कनाल यांनी कुणाल कामराला सूचक इशारा दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.