पिंपरी महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदाच्या माध्यमातून काहीतरी मोठे काम करू, असे वाटले होते. प्रत्यक्षात वर्षभराच्या कारकिर्दीत काहीही भरीव कामगिरी करू शकलो नाही, अशी खंत मावळते सभापती जगदीश शेट्टी यांनी व्यक्त केली. कारकिर्दीत एखादा मोठा प्रकल्प व्हावा, नागरिक नाव काढतील, असे काहीतरी काम व्हावे अशी इच्छा होती. मात्र, गटर, शौचालये, सांडपाणी, डांबरीकरण अशी नेहमीचीच कामे वर्षभर करावी लागली, त्याशिवाय काहीही करता आले नाही, असेही ते म्हणाले.
स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून शेट्टी यांची मंगळवारी शेवटची सभा झाली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला. आपण समाधानी नाही, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. अपेक्षित ‘उद्दिष्टपूर्ती’ न झाल्याची  नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. वर्षभर कोणतेही मोठे काम समितीकडे आले नाही. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी ‘तशी’ कामे येऊ दिली नाहीत. त्यामुळे वर्षभरातील ठळक कामगिरी आपल्याला सांगता येणार नाही. पर्यटन विकास आराखडा, बालनगरी, हरीण उद्यान, मत्स्यालय यासारखे मोठे प्रकल्प रांगेत होते. वर्षभर पाठपुरावा करूनही स्थायी समितीसमोर ते  आले नाहीत, त्याला मूर्त स्वरूपही देता आले नाही. ‘सायन्स पार्क’ चे उद्घाटन कारकिर्दीत झाले. प्राधिकरणातील नियोजित नाटय़गृह सुरू होईल, मात्र, त्याचे सगळे काम पूर्वीच झाले होते. वर्षभर नेहमीचीच कामे केली, मात्र भरीव काही केले नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader