राज्यातील दोन दिग्गज नेत्यांच्या लेकींनी आपल्या पक्षाची धुरा खांद्यावर घेत प्रचाराची राळ उडवली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये येऊन चार सभा घेत खासदार मुंडेंवर शरसंधान करताना त्यांना पराभूत करण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे मुंडे यांची कन्या आमदार पंकजा पालवे यांनीही थेट बारामतीत जाऊन पवारांचे राजकारण संपवा, असे प्रतिआवाहन केले. कट्टर विरोधक असलेल्या पवार-मुंडेंच्या लेकींनीही आपल्या बाबांसाठी लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकांच्या कार्यक्षेत्रात जाऊन लक्ष वेधून घेतले आहे.
बीड हा गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय गड असला, तरी सध्या येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राज्याच्या राजकारणात पवार व मुंडे यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मागील वेळी सर्व ताकद पणाला लावूनही मुंडे दीड लाखाच्या मताधिक्क्याने विजयी झाले. परिणामी ५ वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय कौशल्य पणाला लावून मुंडेंच्या पुतण्यासह बहुतांशी सहकारी फोडून राष्ट्रवादीत घेतले. या वेळी राष्ट्रवादीकडून सुरेश धस यांना मदानात उतरवले आहे. धस यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केज व बीड येथे दोन सभा घेऊन मुंडेंना पराभूत करण्याचे आवाहन केले. माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या निवासस्थानी भेट व रमेश आडसकरांच्या कामांचे कौतुक करून सुळे यांनी माजी आमदार उषा दराडे यांच्या घरीही भेट दिली.
बारामतीत काही दिवसांपूर्वी भाजप आमदार पंकजा पालवे यांनी एल्गार मेळावा घेऊन पवारांवर जोरदार टीका केली होती. बीडमध्ये येऊन सुळे यांनी समाचार घेत ज्यांना स्वतचे घर सांभाळता येत नाही त्यांनी बारामतीत येऊन ढवळाढवळ करूनये, असा सल्ला पालवे यांना दिला, तर दुसरीकडे पंकजा पालवे यांनीही बारामतीत जाऊन महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा अर्ज दाखल करून जाहीर सभा घेताना पवारांचे राजकारण संपवण्याचे आवाहन केले.
परस्परविरोधी दोन दिग्गज नेत्यांच्या लेकींचे भाषण ऐकण्यास दोन्ही ठिकाणी लोकांची चांगली गर्दी जमली. सुळे या बारामतीत उमेदवार असताना त्यांनी बीडमध्ये येऊन प्रचारसभा घेतल्या, तर पालवे यांनी बारामतीनंतर बीड मतदारसंघात दोन सभा घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा