कोकण रेल्वे समन्वयक समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी

सावंतवाडी : करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात. अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, होळी आणि गणपतीला गावी जातोच, हे सर्वश्रुत आहे. प्रत्येक वर्षी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, बडोदा, सुरत या व इतर काही शहरातून हा कोकणी माणूस लाखोंच्या संख्येने आपल्या कुटुंबासह गावी जात असतो. या वर्षी करोनाच्या साथीमुळे काही नागरिक आधीच गावी गेले आहेत. त्यामुळे यावर्षी गणपतीत गावी जाणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गावची घरे संपूर्ण बंद असणे, सर्व नातेवाईक बाहेरगावी असणे या व इतर काही कारणांमुळे बऱ्याच नागरिकांना गावी जाणे भाग आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

कोकण रेल्वे समन्वयक समितीचे अध्यक्ष डी. के. सावंत, कार्याध्यक्ष नितीन गांधी, सचिव अक्षय महापदी व खजिनदार रमेश सावंत यांनी मागणी केली आहे.

मुंबईतून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे जायला रेल्वे सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. परंतु, राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासावर बंदी घातलेली असल्यामुळे रेल्वेने महाराष्ट्र राज्यांतर्गत आरक्षण दिलेले नाही व गणपती विशेष गाडय़ा देखील अद्याप सोडलेल्या नाहीत. तसेच, राज्य परिवहन सेवादेखील बंद असल्याने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. तरी, आपण संबंधितांना सूचना देऊन मध्य व पश्चिम रेल्वेला उत्तर भारतात सोडलेल्या श्रमिक विशेष गाडय़ांच्या धर्तीवर गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर योग्य दरात विशेष गाडय़ा सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

ई -पासचा उद्देश फक्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची नोंद म्हणून असावा, त्यात संमतीची अट नसावी व ते वेळेत उपलब्ध करून द्यावेत.विलगीकरण कालावधी किती असेल ते लवकरात लवकर ठरवून जनतेला तशा सूचना द्याव्यात.करोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या व्यक्तींना विलगीकरण नियमातून सूट देता येईल का? याची चाचपणी करावी. शक्य झाल्यास माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी यातील प्रत्येक स्थानकासाठी एक रेल्वे सोडल्यास गर्दीचे योग्य नियोजन करता येईल.सर्व रेल्वे व बसचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे सुचविले आहे.

Story img Loader